बैलपोळ्याच्या दिवशी बैल धुवायला जाताना पाय घसरून पाण्यात बुडाल्याने दोन गावांमध्ये ५ शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील उदगीरजवळील हेर गावात कमलाकर बदुरे (वय ५५) हे आपल्या सिद्धेश्वर (वय २०) व रुपेश (वय २४) या मुलांसह बैल धुण्यासाठी पाझर तलावावर गेले होते. बैल धुवत असताना सिद्धेश्वरचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याचा रुपेशने प्रयत्न केला, पण तोही बुडाला. ते पाहून त्याचे वडील कमलाकर बदुरे दोन्ही मुलांना वाचविण्यास पाण्यात उतरले. परंतु तेही बुडाले.
औसा तालुक्यातील वाघोली गावात धोंडीराम मोरे (वय ५५) आपल्या नानासाहेब (वय १८) या मुलासह बैल धुण्यासाठी पाणवठय़ावर गेले होते. नानासाहेब बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी मोरे यांनी पाण्यात उडी मारली, पण दोघेही बुडून मरण पावले. बैलपोळ्याच्या दिवशी पाच जणांना अशा प्रकारे जीव गमवावा लागल्यामुळे हेर व वाघोली गावांत शोककळा पसरली.