कित्येक तास वीजपुरवठा खंडित
नाशिक जिल्ह्यातील काही भागात यापूर्वीच हजेरी लावणाऱ्या पावसाचे रविवारी मध्यरात्री अखेर शहरातही आगमन झाले. चार ते पाच तासात ३९.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा पहिलाच फटका शहरवासीयांना सहन करावा लागला.
अनेक भागातील वीज पुरवठा सलग ८ ते १५ तास ठप्प होता. परिणामी, कित्येक ठिकाणी पाणी पुरवठाही होऊ शकला नाही. पंचवटीतील तपोवन परिसरात धार्मिक विधीसाठी उभारलेला सभा मंडप जमीनदोस्त झाला. पावसामुळे उकाडा अधिकच वाढला आहे.
जळगाव जिल्ह्यात काही भागात पावसाने तुरळक हजेरी लावली असली तरी धुळ्याला मात्र त्याची प्रतीक्षा आहे.
तीन महिने टळटळीत उन्हाची दाहकता अनुभवणाऱ्या उत्तर महाराष्ट्रात आठवडय़ापासून ढगाळ वातावरण व अधुनमधून वाहणारी जोरदार हवा यामुळे बदल झाल्याचे दिसत होते. नाशिक जिल्ह्यातील काही भागात दोन दिवसापासून वादळी वारा व विजांसह पाऊस कोसळला. एकलहरे व नाशिकरोड परिसरात हजेरी लावणारा पाऊस नाशिकच्या हद्दीत दाखल झाला खरा, परंतु संपूर्ण शहर त्यापासून अलिप्त राहिले होते. ही कसर रविवारी रात्री भरून निघाली. रविवारी रात्री साडे बाराच्या सुमारास विजांच्या कडकडाटात त्याचे आगमन झाले. प्रारंभी मुसळधार असणारे त्याचे स्वरूप काही वेळाने कमी झाले. परंतु, अगदी पहाटेपर्यंत म्हणजे सलग चार ते पाच तास त्याची रिपरिप सुरू राहिली.
पहिल्याच पावसाने महावितरण कंपनीला दणका दिला. यावेळी खंडित झालेला वीज पुरवठा सोमवारी दुपापर्यंत पूर्ववत होऊ शकला नव्हता. खरेतर पावसाळ्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून कंपनीमार्फत मान्सुनपूर्व तयारीची कामे करण्यात आली होती. परंतु, रिपरिप पावसात कंपनीची यंत्रणा कोलमडली. परिणामी, शहरातील काही भागात पाणी पुरवठाही होऊ शकला नाही. सोमवारी दुपापर्यंत अनेक भागातील वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.
किमान ८ ते कमाल १५ तासांहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित राहिल्याने सर्वसामान्यांना नाहक जाच सहन करावा लागला. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी दिवसभर युद्धपातळीवर काम केले जात असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
र्पजन्यवृष्टीसाठी जय जनार्दन स्वामी भक्त परिवारातर्फे तपोवन परिसरात यागाचे आयोजन केले होते. त्यासाठी उभारलेला सभा मंडप पावसाने जमीनदोस्त झाला. काही किरकोळ अपवाद वगळता इतरत्र असे प्रकार घडले नसल्याचे अग्निशमन विभागाने म्हटले आहे. शहरात ३९,८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. पावसामुळे सोमवारी उकाडय़ाचे प्रमाणही वाढले. दुपारी ऊन पडले असले तरी आकाशात अधुनमधून ढगही जमा होत असल्याचे दिसत होते.
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात पावसाने आधीच हजेरी लावली. दिंडोरी शिवारात दौलत नाईकवडे यांच्या दोन गायी वीज पडून मरण पावल्या तर वणी-पिंपळगाव रस्त्यावर वादळामुळे कांद्याचे चार शेड कोसळले. या ठिकाणी महिला व पुरूष काम करत असताना हा प्रकार घडला. त्यात सोनाली रकीबे (१९) व रावसाहेब उशिरे (३२) हे जखमी झाले.
विंचूर, पेठ, त्र्यंबकेश्वर, न्यायडोंगरी आदी भागात पावसाने हजेरी लावली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा