जिल्ह्य़ातील दुष्काळी स्थितीचा विचार करून सर्व शिधापत्रिकाधारकांना पाच किलो गहू व एक किलो तांदूळ, असे अतिरिक्त धान्य देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दारिद्रय़रेषेखालील व दारिद्रय़रेषेवरील दोन्ही शिधापत्रिकाधारकांना हे अतिरिक्त धान्य देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा दक्षता समिती बैठकीत अध्यक्षस्थानावरून टोपे यांनी, सर्व शिधापत्रिकांचे १०० टक्के वाटप पुढील बैठकीपर्यंत झाले पाहिजे, असे सांगितले. जिल्ह्य़ात २ लाख ९० हजार शिधापत्रिकाधारक आहेत. पैकी ४५ हजार शिधापत्रिकाधारकांची खाती बँकेत उघडली आहेत.
टोपे यांनी जिल्ह्य़ातील दुष्काळी स्थितीतील उपाययोजनांचा आढावा घेतला. लोकसंख्येच्या प्रमाणावर पाण्याचे टँकर सुरू करावेत, विहिरींचे गरजेनुसार अधिग्रहण करावे, पाणी भरण्यासाठी जनित्र अथवा डिझेल इंजिनाचा आवश्यकतेनुसार विचार करावा, पाणी साठवण्यास प्लास्टिक टाक्या उपलब्ध कराव्यात, जिल्हा नियोजनात टंचाई निवारणासाठी राखून ठेवलेल्या ८ कोटी निधीचा विनियोग करावा, बदनापूर पाणीपुरवठय़ासाठी मंजूर केलेले विजेचे एक्स्प्रेस फीडर लवकर बसवावे आदी सूचना टोपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी श्याम देशपांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अविनाश रणखांब, उपविभागीय महसूल अधिकारी राजू नंदकर, सर्व तहसीलदार त्याचप्रमाणे जिल्हा दक्षता समितीचे अशासकीय सदस्य अप्पासाहेब भालेराव, महेंद्र पवार आदींची उपस्थिती या बैठकीस होती.
दुष्काळात शिधापत्रिकाधारकांना पाच किलो गहू, किलोभर तांदूळ
जिल्ह्य़ातील दुष्काळी स्थितीचा विचार करून सर्व शिधापत्रिकाधारकांना पाच किलो गहू व एक किलो तांदूळ, असे अतिरिक्त धान्य देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
First published on: 08-03-2013 at 02:32 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five kg wheat one kg rice in drought to ration card holder