उत्तर महाराष्ट्रातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून नंदुरबार जिल्ह्यात तीन नगरपालिकांवर एकहाती सत्ता मिळवत राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. नाशिक जिल्ह्यात शहरी भागात वर्चस्व सिद्ध करणाऱ्या मनसेने ग्रामीण भागातही पाय रोवण्यास सुरूवात केल्याचे त्र्यंबकेश्वर पालिकेच्या निकालावरून दिसून येत आहे. या पालिकेत सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून मनसे पुढे आला आहे. तर, ईगतपुरी पालिकेतील आपली सत्ता अबाधित राखण्यात शिवसेनेला यश मिळाले. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत काही विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोडदौडीला काँग्रेसने लगाम घातला आहे. एकेका जागेसाठी झगडण्याची वेळ राष्ट्रवादीवर आल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर तर नंदुरबारच्या नवापूर, नंदुरबार व तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सोमवारी पार पडली. मतपेटीतून धक्कादायक निकाल बाहेर आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीला चांगलेच महत्व प्राप्त झाले होते. यापूर्वी सर्वपक्षीयांच्या कडबोळ्याची असणारी सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वच पक्ष जय्यत तयारीने मैदानात उतरले. त्यात मनसे १७ पैकी सहा जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. तर, राष्ट्रवादी ४, काँग्रेस ३, अपक्ष २, भाजप व शिवसेना प्रत्येकी एक, याप्रमाणे निकाल लागले. भाजपच्या या बालेकिल्ल्यात मनसेने जोरदार मुसंडी मारली.
एकाच प्रभागातील पाच जागा जिंकल्या. राज्यातील बदलत्या पाश्र्वभूमीवर सेना-भाजपच्या सहकार्याने मनसे सत्ता स्थापन करू शकते का, हा औत्सुक्याचा विषय आहे. यापूर्वी नगरपालिकेत विरोधी पक्ष नव्हता. यानिमित्ताने तोही नगरपालिकेत कार्यरत होईल, असे चित्र आहे.
विजयी उमेदवारांमध्ये मनसेचे यशवंत भोये (६०२), अनघा फडके (१०६२), आशाबाई झोंबड (९४८), यशोदा अडासरे (१२५८), योगेश तुंगार (९९५), अभिजित कण्णव (९३२), राष्ट्रवादीचे राजेंद्र सोनवणे (७१३), शकुंतला वटाणे (७०१), अंजनाबाई कडलग (८१५), अलका शिरसाठ (७३१), काँग्रेसचे बाळासाहेब लळीत (८०६), सिंधूबाई माढे (७२९), रवींद्र गमे (५९५), भाजपच्या तृप्ती धारणे (अविरोध) तर शिवसेनेचे संतोष कदम (८५०) यांच्यासह अपक्ष विजया लढ्ढा (१०१५) व धनंजय तुंगार (१०४१ ) यांचा समावेश आहे.
ईगतपुरी पालिकेत १८ पैकी ११ जागा मिळवित शिवसेनेने शंभर टक्के यश मिळवित आपली सत्ता कायम राखली. राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या तर काँग्रेस, मनसे, भाजप व शिवसेनेला साथ करणाऱ्या पर्यटन विकास आघाडीला आपले खातेही उघडता आले नाही. शिवसेनेच्या नीलिमा सोनवणे (अविरोध), ज्ञानेश शिरोळे (१५३५), शशिकांत उबाळे (९७३), जनाबाई खताळे (१७०३), रुक्मिणी डावखरे (१३१६), रत्ना विजय जाधव (२२९४), संजय इंदुलकर (१८६७), संगीता वारघडे (१०३८), अलका चौधरी (१३६३), सुनील रोकडे (१२७०), सतीश कर्पे (१४१५) तर राष्ट्रवादीचे प्रमिलाबाई भोंडवे (११८८), नरेंद्र कुमरे (१०६०), शोभराज शर्मा (८८९), उज्वला जगदाळे ( १०५२), यशवंत दळवी (१४२५), फिरोज पठाण (१३८६), शोभा चांदवडकर (१६००), जुलेखा शेख (१२९६) यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीचे डॉ. विजयकुमार गावित आणि काँग्रेसचे खा. माणिकराव गावित व माजी आमदार सुरूपसिंग नाईक यांच्यातील सततच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यावर पुन्हा एकदा पकड मिळविण्यात काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळविले आहे.
गेल्या काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसची विचित्र स्थिती केली होती. परंतु, नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने त्याचे उट्टे काढले. सर्वाचे लक्ष लागलेल्या नंदुरबारच्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला जोरदार धक्के दिले. ३७ पैकी ३६ जागा जिंकून काँग्रेसने आपली सत्ता कायम राखताना राष्ट्रवादीची धुळधाण उडविली. यापूर्वी पालिकेत राष्ट्रवादीचे १२ सदस्य होते. त्यांच्या ११ जागा काँग्रेसने हिसकावून घेतल्या. विजयी उमेदवारांमध्ये दीपक कटारिया, काश्मिरा बोरसे, विद्या शिंदे, आशा शर्मा, रवींद्र मराठे, निखील परदेशी, अंजना रघुवंशी, दीपक दिघे, कुणाल वसावे, आशा पाटील, वंदना पाटील, लिला साळवे, सुनिता बागूल, अनिता चौधरी, राजेश परदेशी, खान परवेझभाई करामतभाई, कसाई शकीनाबी शे. रोशन, कुरेशी नफीसाबी इकबाल, शेख रोशनआरा जियाउद्दीन, रसिकलाल पेंढारकर, ईश्वर चौधरी, भारती कुंभार, भारती राजपूत, शिलाबाई कडोसे, कलावती पाडवी, किरण रघुवंशी, रत्ना रघुवंशी, सुरेखा तांबोळी, जयेश दवे, शिरीष चौधरी, विद्या चौधरी, कविता माळी, काशिनाथ चौधरी, शाह तस्लीमबानो लतीफ, राजेंद्र माळी, शकुंतला माळी आणि राष्ट्रवादीच्या रेश्मा खानवाणी या एकमेव उमेदवाराचा विजेत्यांमध्ये समावेश आहे.
नवापूर पालिकेत १८ पैकी १३ जागा जिंकून काँग्रेसने आपली सत्ता अबाधित राखण्यात यश मिळविले. परंतु या पक्षाचे विद्यमान नगराध्यक्ष दामू बिऱ्हाडे यांना ५२ मतांनी पराभूत व्हावे लागले. राष्ट्रवादीला चार तर एक अपक्ष विजयी झाला. विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या अनिता मावची (१४६९), ज्योती जयस्वाल (१६०३), चंद्रकांत नगराळे (१३००), आशिष मावची (१४५१), रेणुका गावित (२७४२), दर्शना राजेंद्र राणा (२३९७), हारूण शब्बीर खाटीक (२१६०), अय्युब महंमद बलेसरिया (१९३०), जयंत वसावे (१८१५), मेघा जाधव (२०२७), अजय पाटील (१६१०), सईदा आरीफ शेख (१४३९), गिरीश गावित (१६४९), राष्ट्रवादीचे नरेंद्र नगराळे (१३६०), रजिरा गावित (९६३), शिरीश प्रजापत (९७७), रिना पाटील (९१३) आणि अपक्ष सुशिला आहिरे (११७३) यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे नरेंद्र नगराळे यांनी विद्यमान नगराध्यक्षांना पराभूत केले.
तळोदा नगरपालिकेतही काँग्रेसने सत्ता हस्तगत करण्यात यश मिळविले. एकूण १७ पैकी काँग्रेसने ११ जागा तर भाजपने चार व शिवसेनेने दोन जागांवर विजय मिळविला. सर्व जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी साफ धुडकावून लावले. त्यांना एकही जागा मिळाली नाही. यापूर्वी नगरपालिकेत काँग्रेस व सर्वपक्षीय आघाडी सत्तेत होती.
विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या सिंधू पिंपळे (१९६९), कांताप्रकाश ठाकरे (१८८३), योजना माळी (१९२६), माजी नगराध्यक्ष भरत माळी (१८०२), रूखसाना बी अब्बास सय्यद (११५४), गौरव वाणी (१३८७), सुनंदा पाडवी (२११४), सतीवान पाडवी (१७७२), रत्ना चौधरी (१८१८), अपर्णा माळी (१८३८), संजय माळी (१८५०), भाजपच्या सुनीता वाणी (१८०४), वसुबाई पाडवी (१४६७), विवेक चौधरी (१३४७), भरतसिंग राहासे (१४४८), सेनेच्या कोमल सोनार (१७०२) व निर्मला कुलकर्णी (२०७८) यांचा समावेश आहे. निवडणुकीत भास्कर मराठे, अजय परदेशी व वंदना मगरे या विद्यमान नगरसेवकांसह माजी उपनगराध्यक्ष रूपसिंग पाडवी यांना पराभवाचा सामना करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा