अमेरिकेतील दोन महिन्यांच्या अभ्यास दौऱ्याची सविस्तर माहिती डॉ. श्रीकर परदेशी यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एका सादरीकरणाद्वारे दिली. जवळपास पाच तास चाललेल्या या बैठकीत आयुक्तांच्या दौऱ्याविषयी सुरुवातीला बराच उत्साह दाखवणारे व अनेक शंका विचारणारे अधिकारी बैठक लांबतच गेल्याने तितकेच कंटाळलेही.
आयुक्तपदी रुजू झालेल्या परदेशींनी दर आठवडय़ाला आढावा बैठक घेण्याची प्रथा सुरू केली. दौऱ्यानंतरची पहिलीच बैठक बुधवारी साडेचारच्या सुमारास सुरू झाली, ती रात्री साडेनऊपर्यंत चालली, असे सांगण्यात आले. अमेरिका दौऱ्याची सविस्तर माहिती आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिली. इतर कोणतीही चर्चा यावेळी झाली नाही. वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, ओमाहा, फिलाल्डेफिया आदी शहरांना भेटी देऊन तेथील प्रशासकीय कामाचा व मूलभूत व्यवस्थापन कामाचा आयुक्तांनी केलेला अभ्यास व त्याचे सचित्र सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्या शहरांमधील कचरा, सांडपाणी, वाहतूक, नगररचना, आपत्ती व मोकळ्या जागांचे व्यवस्थापन, पर्यावरणपूरक प्रकल्प, प्रभावीपणे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व नागरिकांचे गट आदींची सविस्तर माहिती त्यांनी दिली. अमेरिकेप्रमाणे िपपरी-चिंचवडमध्ये काय गोष्टी करता येतील, याचे विवेचन त्यांनी केले. जगात काय चाललयं, तंत्रज्ञान कसे प्रगत झाले आहे व त्यात आपण नेमके कुठे आहोत, या मुद्दय़ांवर आयुक्तांनी भर दिला. अमेरिकेत आलेले सँडी वादळ व तेव्हा राबवण्यात आलेली यंत्रणा याचा अनुभव त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडला. १०० टक्के कर भरण्याची अमेरिकन नागरिकांची मानसिकता व शासकीय कामात हस्तक्षेप न करण्याची लोकप्रतिनिधींची भूमिका कौतुकास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जकात बंद होण्याची शक्यता गृहित धरून उत्पन्न मिळून देणाऱ्या अन्य विभागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. बैठकीत सुरुवातीला अधिकाऱ्यांना उत्साह होता,
नंतर तो पूर्णपणे मावळला. शंका-कुशंका विचारणारे अधिकारी उशीर होत गेला तसे चिडीचूप झाले. मात्र, आयुक्तांना सांगण्याचे कोणाचे धाडस न झाल्याने कंटाळलेल्या अवस्थेत अधिकाऱ्यांनी अमेरिका पुराण ऐकले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा