पंचायत समितीच्या सभापतींच्या पतीसह चौघांना बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात अमरावती विभागाच्या अतिरिक्त पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशावरून येथील वडगाव रोड पोलीस ठाण्याचे पाच पोलीस शिपाई निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंगळवारी येथे वार्ताहर परिषदेत दिली. सुमित सोनोन, नितीन गावंडे, सुरेंद्र जगदळे, धर्मेद्र आडे आणि आशीष गुल्हाने, अशी निलंबित झालेल्या शिपायांची नावे आहेत. दरम्यान, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडणारा अट्टल गुन्हेगार जितेंद्र पावडे आणि गब्बर या दोघांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे.
चार दिवसांपूर्वी पंचायत समिती सभापती सपना लंगोटे यांचे पती संजय लंगोटे यांच्यासह चौघांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. हे चौघेही उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल आहेत. नागरिकांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चे काढून वडगाव बंद ठेवले होते. संजय लंगोटेसह चौघांनी पोलीस शिपायांना मारहाण केली होती, कारण त्यांच्या मोटारसायकलींची तपासणी करून पोलिसांनी दंड आकारला होता. याप्रकरणी पोलीस महानिरीक्षकांनी   चौकशी  केली होती. चौकशी अहवालावरून पाच पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले.
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडणारा अट्टल गुन्हेगार जितेंद्र पावडे आणि गब्बर या दोघांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र पावडे अमरावतीचा राहणारा आहे. त्याने एकाच दिवशी तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले होते.
पोलिसांनी पाठलाग करून त्याला नांदगाव खंडेश्वरला पकडले, तर गब्बर हा यवतमाळचाच गुन्हेगार असून तो जुगार अड्डासुद्धा चालवतो. पोलिसांनी या आरोपींकडून जवळपास ४ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र जप्त केले आहे.
या प्रकरणात यापूर्वी हिमांशू लोहाणा या उद्योजक पुत्रास अटक केलेली आहे. चोरीचे मंगळसूत्र अल्प किमतीत घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा