* डॉ. किरीट सोमय्यांचा आरोप
* ‘एसआयटी’मार्फत चौकशीची मागणी
राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे ‘भ्रष्टाचाराचे सार्वजनिक बांधकाम’ असा उल्लेख करून या विभागात जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. राज्यातील सार्वजनिक बांधकाम घोटाळ्याची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
सिंचन घोटाळ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळा हा महाराष्ट्राला लागलेला मोठा कलंक असून मंत्री, अधिकारी आणि कंत्राटदारांनी एकत्रितपणे केलेले भ्रष्ट बांधकाम म्हणजे हा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. नाशिकच्या चिखलीकर घोटाळ्यानंतरही सरकारचे डोळे उघडत नाही, याबद्दल सोमय्या यांनी खेद व्यक्त केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी नाशिक येथे अधिकाऱ्यांची केलेली पाठराखण ही अत्यंत दुर्दैवी असून भुजबळ हे भ्रष्टाराचाची खिल्ली उडवित आहेत, असा आरोप त्यांनी केला. अभियंते व कंत्राटदारांना पाठिंबा देणाऱ्या भुजबळांच्या वक्तव्याला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहमत आहेत का? स्वीय सहायक संजय बेडसेवर कारवाई झाली तर घोटाळे उघडकीस येण्याची भीती भुजबळांना वाटते का? मंत्री, अभियंते आणि कंत्राटदार यांचे संगनमत असून ते पत्नी व मुलांच्या कंपन्यांना गैरमार्गाने कंत्राट देतात, याला भुजबळ, पवार व चव्हाणांचा पाठिंबा आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या अभियंत्यांनी त्यांच्या पत्नी व मुलांच्या कंपन्यांना बांधकामांची कंत्राटे दिली अशा १९ अधिकाऱ्यांच्या नावांची यादी सोमय्या यांनी राज्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे सादर केली असून बांधकाम घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेला भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, प्रवक्ते गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे व चंदन गोस्वामी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा