आईच्या कुशीत झोपलेली एक पाचवर्षीय बालिका बिबटय़ाच्या भक्ष्यस्थानी पडली. माय-लेकी गाढ झोपेत असतानाच बिबटय़ाने झडप घालून आईच्या कुशीतून मुलीला जबडय़ात धरून कोणाला काही कळण्याच्या आत येथून धूम ठोकली. या हृदयद्रावक घटनेमुळे त्या परिसरात नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
तालुक्याच्या उत्तर भागातील गणोरे येथे काल (मंगळवार) रात्री ही घटना घडली. दरम्यान, या नरभक्षक बिबटय़ाला पकडण्यासाठी गणोरे परिसरात चार ठिकाणी वन विभागाने पिंजरे लावले आहेत. अनिता बाबूराव भरकडे (वय ५) असे या बालिकेचे नाव आहे.
पुणे जिल्ह्याच्या भिमा पाटस (ता. दौंड, जि. पुणे) येथील बाबू एकनाथ भरकडे हे मेंढपाळ दरवर्षीप्रमाणे मेंढय़ांचा कळप घेऊन नगर जिल्ह्य़ातील गणोरे परिसरात आले होते. िशदेवाडी परिसरातील एका शेतात त्यांचा मुक्काम होता. सुमारे दोनशे मेंढय़ा त्यांच्या कळपात आहेत. मेंढय़ांच्या वासाने रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक बिबटय़ा तेथे आला. मात्र मेंढय़ा तात्पुरत्या कुंपणाच्या आत असल्यामुळे त्याला मेंढी पळवता आली नाही.
तेथे जवळच बाबूराव भरकडे यांची पत्नी छाया ही आपल्या दोन मुलांना कुशीत घेऊन झोपली होती. एका बाजूला अनिता, तर दुसऱ्या बाजूला मुलगा झोपलेला होता. झोपेत बहुदा मुलीची हालचाल झाल्यामुळे बिबटय़ाचे लक्ष तिकडे गेले असावे.
बिबटय़ाने झडप घालून आईच्या कुशीत झोपलेल्या त्या पाचवर्षीय बालिकेला जबडय़ात धरुन धूम ठोकली. आईच्या ओरडण्याने, तसेच कुत्र्यांच्या भुंकण्याने परिसरातील ग्रामस्थ व मेंढपाळ जागे झाले. त्यांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. सकाळी परिसरात या घटनेचे वृत्त समजताच तेथे एकच गर्दी झाली. सभोवताली शोध घेतल्यानंतर सुमारे हजार ते बाराशे फूट अंतरावर उसाच्या शेतात बिबटय़ाने खाल्लेल्या मुलीचा मृतदेह आढळून आला. तिचा फक्त धडावरचा भागच शिल्लक होता.
वन विभाग व पोलिसांना ही घटना कळविण्यात आली. पोलीस, तसेच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला. उपविभागीय वन अधिकारी शिवाजी फटांगरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळाला भेट दिली व संबंधीत कुटुंबियांचे सांत्वन केले.
दुपारी संबंधीत कुटुंबाला दोन लाख रुपये नुकसान भरपाईचा धनादेशही अदा करण्यात आला. तहसीलदार माणिक आहेर, सभापती अंजना बोंबले उपस्थित होत्या.
देवठाण-गणोरे परिसरात दोन-तीन बिबटय़ांचे वास्तव्य असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नरभक्षक बिबटय़ाला पकडण्यासाठी परिसरात चार ठिकाणी वन विभागाने िपजरे लावले असल्याची माहिती फटांगरे यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी गणोरे येथून जवळच असलेल्या डोंगरगाव येथील बालक बिबटय़ाच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा