एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील पोलीस मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या भगवाननगर झोपडपट्टीतील ३७१ लाभार्थ्यांना येत्या नऊ महिन्यात पक्क्य़ा घरांचा ताबा देण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.
भगवाननगर झोपडपट्टीत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत आठ कोटी खर्च करून पक्की घरे बांधण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिका सभागृह नेते महेश कोठे हे अध्यक्षस्थानी होते. स्थानिक नगरसेवक मेघनाथ येमूल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार शिंदे यांच्यामुळेच ही योजना साकार होणार असल्याचे येमूल यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
आमदार शिंदे म्हणाल्या, शहरातील सर्व झोपडपट्टय़ांचे सर्वेक्षण केले जात असून हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच या सर्व झोपडपट्टय़ांमध्ये पक्की घरे बांधण्याचे नियोजन आखले जाणार आहे. भगवाननगर झोपडपट्टीतील काम केवळ मक्तेदाराच्या दिरंगाईमुळे रेंगाळले होते. आता हे काम दुसऱ्या मक्तेदाराकडे सोपविणात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महेश कोठे यांच्यासह महापालिका स्थायी समितीचे सभापती विनायक कोंडय़ाल, नगरसेवक अनिल पल्ली, सामाजिक कार्यकर्ते महादेव घोडके यांची भाषणे झाली. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. तर जितेंद्र वाडेकर यांनी आभार मानले. यावेळी पालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नीला खांडेकर, नगरसेवक दत्तू बंदपट्टे, काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले, आदींची उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा