हजारो मैलांचा प्रवास करीत मुंबईसह उरण परिसरात येणाऱ्या विविध जातींच्या पक्ष्यांमध्ये आकर्षण ठरणारे फ्लेमिंगो पक्षी सध्या उरणच्या पाणजे खाडी परिसरात दाखल झाले आहेत. या परिसरात फ्लेमिंगोना मिळणारे मासे तसेच त्यांचे खाद्य असलेले किडे यामुळे या परिसरात अनेक वर्षांपासून फ्लेमिंगो येत आहेत. त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे छायाचित्र टिपण्यासाठी पर्यटकांची गर्दीदेखील खाडीकिनारी होत आहे. शिवडी खाडी, पामबीच येथील खाडीकिनारी आणि उरण खाडीकिनारी या परदेशी पाहुण्यांचा मोठय़ा प्रमाणात मुक्काम असतो. पांढरा शुभ्र आणि लालपंखी असलेल्या या पाहुण्यांचे विविध पोझ टिपण्यासाठी पर्यटकांचे कॅमेरे सरसावत आहेत. काही दिवसांपूर्वी याच परिसरात फ्लेमिंगोच्या शिकार होत असल्याचे उघड झालेले होते. या संदर्भात वनविभागाने तक्रारही दाखल केलेली होती.
मात्र फ्लेमिंगोंची शिकार होत नसून अपघाताने फ्लेमिंगो मरत असल्याचा दावा करण्यात आला होता. असे असले तरी या परिसरात हजारोंच्या संख्येने परदेशी पक्षी येत आहेत. पक्षी न्याहाळण्यासाठी या परिसरात परदेशी तसेच देशी पक्षीप्रेमी येत आहेत. मागील तीन-चार दिवसांपासून या परिसरात येणाऱ्या पक्षीनिरीक्षणासाठी येथील स्थानिक नागरिकांनीही गर्दी केली होती.
मात्र उन्हाळ्यात परतीच्या मार्गाला लागणारे पक्षी एप्रिल महिन्यातही मुक्कामी असल्याने हा वातावरणातील बदलाचा परिणाम असल्याचे मत पक्षीप्रेमींनी व्यक्त केले आहे. मात्र या परदेशी पक्ष्यांचे दर्शन होत असल्याने पक्षीप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.