एमसीएचआय क्रेडाई, ठाणे या संस्थेच्या वतीने दोन वर्षांनंतर ठाण्यात ‘रिअल इस्टेट’ प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून यामध्ये सदनिका, व्यापारी मालमत्ता, सेकंड होम, प्लॉटस् असे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. यंदा ऑनलाइन नोंदणी तसेच यू टय़ूबच्या माध्यमातूनही या प्रदर्शनाची माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शैलेश पुराणिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.  ठाणे येथील ढोकाळी भागात हायलॅण्ड गार्डन्स येथे १८ ते २१ जानेवारी या कालावधीत हे प्रदर्शन होणार असून यामध्ये ४३ बांधकाम व्यावसायिक, तसेच वित्त संस्थाही सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात सुमारे ५०हून अधिक स्टॉल उपलब्ध असणार आहेत. यामध्ये तीस लाखांपासून दोन कोटींपर्यंत किमतीची घरे उपलब्ध असणार आहेत. तसेच ठाणे महापालिकेच्या स्टॉलचाही समावेश असणार आहे. या स्टॉलवर महापालिकेचे नवे प्रकल्प आणि एलआरटी, ट्रामविषयी माहितीपर सादरीकरण करण्यात येणार आहे, असेही पुराणिक यांनी दिली. यंदा प्रदर्शनाचे १२ वे वर्ष असून गेल्या दोन वर्षांत प्रदर्शन झाले नव्हते. त्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर होणाऱ्या यंदाच्या प्रदर्शनात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या प्रदर्शनाला तरुण आणि नवदाम्पत्य मोठय़ा प्रमाणात हजेरी लावत असल्याने त्यांच्यासाठी ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवरही प्रदर्शनाची माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे, असेही त्यांनी सांगितले. संस्थेचे खजिनदार मुनिश दोशी यांनी ‘इव्हॉलविंग ठाणे’ या संकल्पनेस डिजिटल रूप दिले आहे. त्यामुळे यू टय़ूबच्या माध्यमातूनही या प्रदर्शनाची माहिती उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच ज्यांना प्रदर्शनास भेट देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर २२ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत प्रदर्शनास भेट देण्याची सोय करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. या प्रदर्शनात ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर तर मुलांसाठी किड झोनची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच प्रदर्शनासाठी २५ रुपये शुल्क ठेवण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या हस्ते होणार आहे, असे संस्थेचे सचिव जितेंद्र मेहता यांनी सांगितले.

Story img Loader