संगीताला भाषा नसते, हे जरी खरं असलं तरी प्रत्येक प्रांताचं संगीतवैशिष्टय़ वेगळं असतं. हिंदुस्थानातील संगीताचा विचार केला तर मराठी प्रांतातील गानप्रकारांमध्ये जेवढी विविधता आढळते, तेवढी जगाच्या पाठीवर खचितच अन्यत्र असेल. लोकगीतं, नाटय़गीतं, भावगीतं आदी असंख्य गानप्रकार मराठीत आहेत. त्यामुळेच चित्रपट संगीताच्या लाटेतही मराठी गैरफिल्मी गाणी टिकून राहिली, प्रसंगी उजवी ठरली. हिंदी आणि अन्य भाषांमध्ये मात्र भावगीतांची परंपरा नाही. चित्रपटाव्यतिरिक्त त्यांच्याकडे काय आहे, या प्रश्नाचं उत्तर प्रामुख्याने ‘गजल’ असंच मिळतं. अर्थात, सुरुवातीला गजल हाही गानप्रकार नव्हता तर काव्यवाचनासारखाच प्रकार होता, कालांतराने त्याला संगीतसाज लाभत गेला.
गेल्या काही वर्षांत गजलगायनाची लोकप्रियता वाढत गेली. गजलचे गैरफिल्मी अल्बम किती निघाले असतील, याची तर गणनाच नाही. याच परंपरेत शोभेल अशा एका नव्या अल्बमची निर्मिती वेल्वेट व्हॉइसेस प्रा. लि. या कंपनीने केली आहे तर टाइम्स म्युझिकने हा अल्बम प्रस्तुत केला आहे. प्रसिद्ध दिवंगत शायर फैज अहमद फैज यांच्या एकूण आठ रचना यात असून अमरजित बज्वा यांनी त्यांना स्वरसाज चढविला आहे. गेली अनेक वर्षे गजलगायन करणारे पंकज उधास यांनी या रचना गायल्या आहेत.
या अल्बमचे वैशिष्टय़ म्हणजे फैज अहमद फैज यांची शायरी. ‘कबतक दिल की खैर मनाए, कबतक राह दिखाओगे, कबतक चैन की मोहलत दोगे, कबतक याद न आओगे’ अशा अप्रतिम शायरीने या अल्बमची सुरुवात होते. दरबारी कानडाची सुरावट लाभलेल्या या रचनेत संगीतकाराने व्हायलीन व बासरीचा सुरेख उपयोग केला आहे. यानंतर सामोरी येते ती एक रोमँटिक गजल. ‘यू सजा चाँद की, झलका तेरे अंदाज का रंग, यू फिजा महेकी की बदला मेरे हमराज का रंग’ अशी शब्दकळा त्यास लाभली आहे. ‘सहेल यू राह-ए-जिंदगी की है’ ही पारंपरिक गजल नसून ती बव्हंशी गद्यप्रकारात ऐकू येते, हा प्रयोग दाद देण्यासारखाच.
‘नसीब आजमाने के दिन आ रहे है, करीब उनके आने के दिन आ रहे है, जो दिल से कहा है, जो दिल से सूना है, सब उनको सुनाने के दिन आ रहे है’ ही गजलही चटकन मनाचा ठाव घेते. ‘मोती हो की शीशा जाम की दूर (दूर म्हणजे मोतीच), जो टूट गया सो टूट गया, कब अश्कोंसे जुड सकता है, जो टूट गया सो टूट गया.. जीवनातील क्षणभंगुरतेचं वर्णन करताना जे आपलं राहिलं नाही त्यासाठी रडत बसण्यात काय अर्थ, असा संदेश या शायराने दिला आहे. फैज अहमद फैज यांच्या या सर्वच रचना आशयगर्भ आहेत, मात्र गजल जेवढी बांधीव असावी लागते, त्यास यातील काही गजल अपवाद आहेत. त्यामुळेच त्यांना मीटरमध्ये बंदिस्त करण्यासाठी संगीतकाराला काही ठिकाणी शब्दांची खेचाखेच करावी लागली आहे. पंकज उधास यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत या गजल गायल्या आहेत. लवचिक गायकी नसल्याने चित्रपटगीतांच्या पाश्र्वगायनात त्यांना फार वाव मिळाला नाही, गजलमध्ये शेरोशायरीकडे श्रोत्यांचे अधिक लक्ष असल्याने गायक एकसुरी असेल तरी बिघडत नाही. या अल्बममध्ये पंकज उधास यांचे काही शब्दोच्चार स्पष्ट उतरलेले नाहीत, श्रोत्यांना जिवाचा कान करून गजल ऐकावी लागते. मात्र, गोळाबेरीज केली तर हा अल्बम गजलप्रेमींना निश्चितच नवा आनंद देऊन जातो.
परंपराभारतीय कुटुंब संस्कार हा सध्याच्या ‘फेसबूक युगा’त चेष्टेचाच विषय. मात्र याच विज्ञान-तंत्रज्ञानात रमणाऱ्या तरुणाईला स्पर्धेच्या युगातील आव्हानं झेपत नाहीत आणि तिशी-चाळिशीतच हृदयविकाराला तोंड द्यावं लागतं. संस्कारमूल्य हरवल्याने गुन्हेगारी, असहिष्णुता वाढत चालली आहे, ते वेगळंच.. मनुष्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता कशात आहे, मृत्यूनंतर मनुष्याचे काय होते, मन:शांती कशी मिळवावी, याची उत्तरं ज्यांना आपापल्या देशांत व धर्मग्रंथात मिळत नाहीत, असे लाखो पाश्चात्त्य आज भारतीय अध्यात्माकडे आकृष्ट झाले आहेत, ते या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं त्यात असल्यानेच. ही परंपरा जोपासली तर समाजातील अनेक प्रश्न सुटू शकतील, हे वास्तव आहे. आपल्या संस्करक्षम मुलांना याचंच महत्त्व पटावं, या हेतूने ‘टाइम्स म्युझिक’ कंपनीने ‘परंपरा’ या अल्बमची निर्मिती केली आहे. मंत्र, स्तोत्र आणि प्रार्थना आदी १० रचनांचा यात समावेश असून मनीष नेवार यांनी त्या गायल्या आहेत, बालगायकांनी त्यांना अनुरूप साथ दिली आहे. विवेक प्रकाश यांनी या रचनांना अतिशय समर्पक आणि सुयोग्य स्वरसाज चढविला आहे.
प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांच्या भारदस्त आवाजातील निवेदनाने या अल्बमची सुरुवात होते. त्यानंतर ‘त्वमेव माताश्च पिता त्वमेव’ ही रचना ऐकू येते. मनीष यांच्या साथीने लहान लहान मुलांनी अतिशय उत्कटतेने ती गायली आहे. याशिवाय, या अल्बममध्ये ‘सरस्वती वंदना, ओम जय जगदीश हरे, अच्युतम केशवम, गणेश वंदना, हनुमान चालिसा, गुरू वंदना, शुभंकरोती’ आदी पवित्र रचनांचा प्रसाद मिळतो. या अल्बमचा समारोप ‘वंदे मातरम्’ने करून लहान मुलांमध्ये राष्ट्रभक्तीची बीजे रोवण्याचा स्तुत्य प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. हार्मोनियम, व्हायलीन, मेंडोलीन, सतार, बासरी, ढोलक, तबला आदी वाद्यांचा योग्य ताळमेळ व सर्व गायकांचा सात्त्विक आवाज यामुळे या रचना ऐकताना अतिशय निर्म़ळ व पवित्र वातावरण निर्माण होते. संस्करक्षम मुलांनी (व स्वत:ला सर्वज्ञ समजणाऱ्या तरुणांनीही) हा अल्बम ऐकला तर अनेक सामाजिक समस्या सुटतील, यात बिलकूल अतिशयोक्ती नाही!
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2012 रोजी प्रकाशित
चित्रगीत : दस्तखत
संगीताला भाषा नसते, हे जरी खरं असलं तरी प्रत्येक प्रांताचं संगीतवैशिष्टय़ वेगळं असतं. हिंदुस्थानातील संगीताचा विचार केला तर मराठी प्रांतातील गानप्रकारांमध्ये जेवढी विविधता आढळते, तेवढी जगाच्या पाठीवर खचितच अन्यत्र असेल. लोकगीतं, नाटय़गीतं, भावगीतं आदी असंख्य गानप्रकार मराठीत आहेत.
First published on: 30-12-2012 at 01:20 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flimi song nock