महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण लक्षात घेऊन शहर बस वाहतुकीच्या कंत्राटदार व्यवस्थापनाने तूर्त ही सेवा सुरूच ठेवण्याचे मान्य केल्याने उपनगरी प्रवाशांवरील गंडांतर टळले आहे. मनपात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शहर बस वाहतूक व्यवस्थेतील वाढता तोटा आणि मनपाकडून प्रलंबित असलेल्या विविध सुविधांमुळे होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन या व्यवस्थेची कंत्राटदार कंपनी प्रसन्ना पर्पलने गेल्या रविवारपासून ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसे पत्रही कंपनीने मनपा आयुक्तांना दिले होते. कंपनीचे प्रतिनिधी व मनपात झालेल्या चर्चेनुसार आज पुन्हा बैठक झाली. मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, यंत्र अभियंता परिमल निकम, कंपनीचे प्रतिनिधी रोहित परदेशी यावेळी उपस्थित होते.
मनपा आयुक्त कुलकर्णी यांनी निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण विशद केली. मनपाच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वी कंपनीला येणाऱ्या तोटय़ापोटी नुकसान भरपाईबाबत मासिक २ लाख ९६ हजार रूपये देण्याचा ठराव केला आहे. मात्र त्यात आता बदल करायचा झाल्यास हा विषय पुन्हा सर्वसाधारण सभेपुढेच न्यावा लगेल. मनपाची निवडणूक झाल्यानंतर नवे सभागृह अस्तित्वात येईल, त्यानंतरच मनपाची सर्वसाधारण सभा होऊन याबाबतचा सुधारीत निर्णय घेता येईल, तोपर्यंत कंपनीने ही सेवा बंद करू नये असे आवाहन आयुक्तांनी केले.
मनपाची ही विनंती कंत्राटदार कंपनीने मान्य केल्याने शहर बस वाहतुकीवरील गंडांतर तूर्त टळले आहे. नवे सभागृह अस्तित्वात येईपर्यंत ही सेवा सुरूच ठेवण्याचे मान्य करून कंपनीनेही नगरकरांना दिलासा दिला आहे. या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले.
एएमटीवरील गंडांतर तूर्त टळले!
महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण लक्षात घेऊन शहर बस वाहतुकीच्या कंत्राटदार व्यवस्थापनाने तूर्त ही सेवा सुरूच ठेवण्याचे मान्य केल्याने उपनगरी प्रवाशांवरील गंडांतर टळले आहे.
First published on: 12-11-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flit on amt crists