यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी तालुक्यात सुमारे १५०० मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यातील अरुणावती, पैनगंगा, अडाण या तीनही नद्या ‘ओव्हर फ्लो’ झाल्या होत्या. नदीनाल्याच्या काठावरील सुमारे ५० गावांमधील पिके पुरती उद्ध्वस्त झाली, आणि इतर गावातील पिकांना जबर फटका बसला आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी २५ जूननंतर आर्णी येथे, तर १६ जुलैनंतर राणीधानोरा, सावळी भागात दौरा केला होता. त्यानंतर उशिरा तब्बल दीड महिन्यानंतर १० ऑगस्टला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विदर्भ-मराठवाडय़ाच्या सीमेवरील पैनगंगा नदीच्या काठावरील राणीधानोरा या गावाला भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली. शासनाच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी पूरग्रस्तांच्या जखमांवर तात्पुरते मलाम लावले.
शिवाजीराव मोघे, पालकमंत्री नितीन राऊत व संबंधित वरिष्ठ अधिकारी सर्व शासकीय नियमांप्रमाणे मदत देण्यात येईल, असे आश्वासन देत चालते झाले. शासनाचे नियम पूरग्रस्तांच्या हिताचे नाही. कारण, २००२ पासूनचे खरडीचे शेतकऱ्यांचे पैसे शासन अद्यापपर्यंत देऊ शकलेले नाहीत. या थकित रकमेचे काय झाले, असा प्रश्न आता बळीराजा विचारत आहे. पैनगंगा नदीच्या काठावर राणीधानोरासारखे अनेक गाव तेथील असंख्य समस्या वर्षांनुवर्षांपासून प्रलंबित आहेत. पुराचा धोका निर्माण होतो. हा प्रश्न तर अनेक वेळा शासनाकडे गेला. मात्र त्याला केराची टोपली दाखविण्यात आली. आर्णी तालुक्यात तीन मोठय़ा नद्या व नाल्याचा भौगोलिक विचार केल्यास याा भागातील शेती व्यवसायाच्या दृष्टीने काटेरी मार्ग आहे. शेवटी हा सर्व निसर्गाचा कोप असला तरी त्यांना खरा आधार व दिलासा देण्याची जबाबदारी शेवटी शासनाचीच येते. पूरग्रस्त शेतकऱ्यांना, नागरिकांना केवळ दीड महिन्यांपासून फक्त आश्वासनांची खैरात सुरू असली तरी प्रत्यक्षात कोणाच्याही हाती दमडीही पडलेली नाही.
परिणामी शेतकऱ्यांमध्ये जनक्षोभ निर्माण होऊ लागला आहे. पूरग्रस्त नागरिकांनी न्यायासाठी तहसीलदारांना घेराव घातला तर पालकमंत्र्यांना गाडी थांबवून समस्या ऐकून आश्वासन देण्याची पाळी शेंदूरशनीसह उमरखेड व महागाव तालुक्यात आली. शासनाने उदासीन धोरण राबवू नये व शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. तात्काळ सव्र्हे करून मदतीचा हात द्यावा. सव्र्हेमध्येच एक महिना गेला. यंत्रणा अपुरी पडली. त्यास अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव कारणीभूत ठरला. दौरा उशिरा का होईना पालकमंत्री आले. शेंदुरशनी, महागाव येथे घेरावही झाला. जनक्षोभाला सामोरे जावे लागले.
आर्णी तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामजी आडे यांनी पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांची सभा घेतली. यावेळी आंदोलन करण्याचा निर्णय झाला. एक शिष्टमंडळ शिवाजीराव मोघे यांनाही भेटले. तहसीलदारांना घेरावही झाला. पालकमंत्र्यांची गाडीही थांबवली. अतिवृष्टीमुळे रस्त्यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. त्याबाबत रोष म्हणून शेंदुरशनीला पालकमंत्र्यांची गाडी रोखली व निवेदन दिले. प्रदेश राकाँचे सरचिटणीस ख्वाजा बेग यांनीही दोन पानाचे पत्र उपमुख्यमंत्र्यांना पाठवून पूरग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. दीड महिन्यात चार वेळा पूर आला. शेतकरी व नागरिक हादरले त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणाही कोलमडली आहे. तहसीलमधील एक दिवस तर कोणताही अधिकारी हजर नव्हता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा