कल्याण-डोंबिवली महापालिकेने नागरी वस्तीची हद्द निश्चित करण्यासाठी पूर नियंत्रण रेषा निश्चित केली आहे. या नियंत्रण रेषेच्या परिसरात आणि शहरातील मोठय़ा ४२ नाल्यांच्या भागात मोठय़ा प्रमाणात मातीचे भराव टाकून बेकायदा बांधकामे करण्यात येत असल्याचे चित्र आहे. मागील महिन्यात समुद्राला मोठी भरती आल्यामुळे खाडीचे पाणी कल्याण, डोंबिवली शहराच्या किनाऱ्यावरील भागात शिरले होते. रेल्वेमार्गाजवळील वालधुनी नदीच्या पात्रात गेल्या आठवडय़ापासून नवीन झोपडय़ा उभारण्याचे काम भूमाफियांकडून जोमाने सुरू आहे. बेकायदा भराव टाकल्यामुळे खाडीचे पाणी वस्त्यांमध्ये शिरू लागल्याचे चित्र आहे.  
गेल्या महिन्यात समुद्राला मोठी भरती आली. त्यावेळी खाडीचे पाणी कल्याणमधील रेतीबंदर, गंधारे, वालधुनी, शहाड फाटक, कोन, डोंबिवलीत कोपर, मोठागाव, देवीचापाडा , कुंभारखाणपाडा भागातील निवासी वस्तीत शिरले होते. २६ जुलैच्या महापुरानंतर महापालिका प्रशासनाने मोठय़ा नाल्यांच्या परिसरात होणाऱ्या अधिकृत बांधकामांवर काटेकोर नियंत्रण ठेवले होते. या भागातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी तत्कालीन प्रशासनाने वेळोवेळी पावले उचलून संबंधित विकासक, माफियांना अद्दल घडवली होती. त्यामुळे मोठय़ा नाल्यांच्या भागात अनधिकृत बांधकामे करण्याचे धाडस कोणी करत नव्हते.
मागील काही वर्षांपासून महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे भूमाफियांनी तसेच त्यांच्या जोडीला काही विकासकांनी नाल्यांच्या भागात मातीचे भराव टाकून बांधकामे करण्याचा सपाटा लावला आहे. महापालिका अधिकाऱ्यांशी सलगी करून ही कामे सुरू असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, अशा तक्रारदार नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेत नाल्याजवळील भरावाविषयी तक्रार केली की तक्रारदाराची माहिती भूमाफियांपर्यंत पोहचते, असे काही तक्रारदारांचे म्हणणे आहे. कल्याणमधील मुरबाड रस्त्यावरील पाम बिच हॉटेलमागील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बंद करून झालेले बांधकाम सध्या वादात सापडले आहे. तसेच संतोषी माता, जरीमरी नाला, रामबाग गल्ली, आझादनगर, सांगळेवाडी, चिकनघर, भानू-सागर भागातून वाहत असलेले मोठे नाले, डोंबिवलीत भरत भोईरनगर नाला, कोपर नाला, गांधीनगर नाला, गुप्ते रस्ता, तुकारामनगर, आयरे गाव नाला भागातून वाहणाऱ्या मोठय़ा नाल्यांच्या भागात नाल्यांचे प्रवाह बदलून भराव टाकण्याची कामे सुरू आहेत. या नाल्यांचे प्रवाह थेट खाडीला मिळतात. पूर परिस्थिती, भरतीच्या काळात या नाल्यांमधील पाणी खाडी शहरात शिरू लागल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. महापालिका हद्दीतील ४२ मोठे नाले पूर नियंत्रण रेषेच्या बाहेरून वाहतात. वालधुनी, गणेशघाट भागात रेल्वेमार्गालगत वालधुनी नदीच्या कोरडय़ा पात्रात नव्याने झोपडय़ा बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. देवीचापाडा भागात चौपाटीच्या आरक्षणावर शेकडो चाळी भरत भोईर नाल्याभोवती बांधण्यात आल्या आहेत. भरतीच्या काळात या चाळींच्या चोहोबाजूंनी खाडीचे पाणी शिरल्याने रहिवाशांना गरिबाचा वाडा भागातून फेरा घालून जावे
लागत होते.
यासंबंधी महापालिकेचे जल अभियंता अशोक बैले यांनी सांगितले, वालधुनी नदी भागात शासनाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेने पूर रेषा निश्चित केली आहे. अन्य भागात पूर रेषेचा संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खाडी भागात पूर रेषा अगोदर निश्चित असते. तेथे रेषा निश्चितीचा प्रश्न येत नाही. नाल्यांच्या भागात मातीचे भराव, बांधकामे असतील तर ती त्या विभागांची जबाबदारी असल्याचे महापालिकेतील अन्य एका अभियंत्याने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा