* इरई धरणाचे पाच दरवाजे उघडले
* काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा
पावसाने आज उघडीप दिल्याने पूर ओसरत असला तरी पैनगंगा, वर्धा, वैनगंगा व इरई नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. त्याचा परिणाम शहर व ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी कायम आहे. इरई धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने नदी काठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर पूरग्रस्त भागातच बिल्डर व लोकांनी संकुल व घरे बांधल्याने ५०० लोकांना शाळांमध्ये हलवण्यात आले आहे.
या शहरात सोमवार व मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. त्याचा परिणाम पैनगंगा, वर्धा, वैनगंगा व इरई या प्रमुख नद्यांना पूर आला. पूर्व विदर्भात सर्वच जिल्ह्य़ांना मुसळधार पावसाने झोडपल्याने या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी गाठली. त्याचा परिणाम ग्रामीण भागात नदी काठावरील गावांमध्ये, तसेच शहरात नदी काठावरील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. आज पावसाने उघडीप दिल्याने पाणी हळूहळू कमी होत असले तरी इरई, वर्धा व पैनगंगा या नद्यांच्या पाण्याने डाब मारल्याने परिस्थिती जैसे थे आहे. आज सकाळी रहमतनगर, सिस्टर कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, ठक्कर नगर, वडगाव, विठ्ठल मंदिर वॉर्ड, भंगाराम वॉर्ड, राजनगर, जगन्नाथबाबानगर, महसूल कॉलनी, केंद्रीय उत्पादन शुल्क कॉलनी, बिनबा वॉर्डातील शेकडो घरात पुराचे पाणी होते. आज दुपारीही तीच परिस्थिती कायम आहे. काल रहमतनगरातून ३०० लोक, पठाणपुरा गेटबाहेरील राजनगर १५०, सिस्टर कॉलनी १००, विठ्ठल मंदिर प्रभागातून १५, तर इतर प्रभागातून २५ जणांना किदवाई हायस्कुल, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल, टागोर विद्यालयात हलविण्यात आले होते. आजही पूर परिस्थिती जैसे थे असल्याने हे पाचशे लोक तेथेच मुक्कामाला आहेत.
शहरातील बिल्डर व लोकांनी पूरग्रस्त भागात घरे व भव्य इमारती उभ्या केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पठाणपुरा गेटबाहेर पूरग्रस्त भागात राजनगर उभारण्यात आले. दरवर्षी या भागात पुराचे पाणी येत असतांनाही १५० जण तेथे वास्तव्याला होते. शेवटी जिल्हा प्रशासनाने या लोकांना सुरक्षित बाहेर काढले. पूरग्रस्त भागात या इमारती बांधकामाला परवानी दिलीच कशी, हा प्रश्न आता गंभीर झाला आहे. रहमतनगर, बिनबा वॉर्ड, वडगाव, जगन्नाथबाबानगर, महसूल कॉलनी व ठक्कर कॉलनीत दरवर्षी पुराचे पाणी येते. तेथेही बिल्डरांच्या भव्य इमारती उभ्या राहिल्या आहेत. मनपाच्या अभियंत्यांनी या इमारतींना मंजुरी प्रदान कशी केली, हा गंभीर प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. आज दुसऱ्याही दिवशी या भागात पूर परिस्थिती कायम आहे. अशातच आज दुपारी १२ वाजता इरई धरणाचे पाच दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आल्याने मध्यरात्री या भागात पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. केवळ चंद्रपूरच नाही, तर राजुरा तालुक्यातील चिचोली बु. कोलगाव, विरूर या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे. राजुरातील सास्ती व रामनगर प्रभागात पुराचे पाणी शिरल्याने ७० कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे, तर श्रेयस मुकबधीर विद्यालयातील २५ विद्यार्थी व शिक्षकांना पुरातून बाहेर काढण्यात आले. चिंचोली येथून तीन शेतकऱ्यांना बाहेर काढले. वरोरा व बल्लारपूर तालुक्यातील अनेक गावांनाही पुराचा फटका बसला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, महापौर संगीता अमृतकर यांनी काल व आज पूरग्रस्त भागांचा दौरा करून पाहणी केली, तर उद्या पालकमंत्री संजय देवतळे चंद्रपूर व शनिवारी चिमूर, नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्याचा दौरा करणार आहेत. सध्या पूर परिस्थिती नियंत्रणात असली तरी लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
माणिकगडला सुपर फास्टचा थांबा
पुरामुळे हैदराबाद, राजुरा, आष्टी, अहेरी व वरोरा हे प्रमुख मार्ग बंद असल्याने परिवहन मंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णता विस्कळीत झाली आहे. या भागातील प्रवाशांना जाणे-येणे सोयीचे व्हावे म्हणून जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांनी सेंट्रल रेल्वेला पत्र लिहून राजुरा तालुक्यातील माणिकगड येथे सर्व रेल्वेगाडय़ांचा थांबा देण्याची मागणी केली. रेल्वे व्यवस्थापनाने ही मागणी मान्य केली असून माणिकगड येथे काल बुधवारपासून सर्व रेल्वे गाडय़ा थांबत आहेत.