पावसाने अकोला जिल्ह्य़ाला गेल्या ४८ तासात चांगलेच धारेवर धरले असून या पावसामुळे सर्व धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी, काटेपूर्णा धरणाचे १०, तर वानचे ६ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान, पूर्णा नदीला मोठा पूर आला असून वाघोली येथील गांधीग्रामच्या पुलावरून किमान १५ फूट उंचीवरून पाणी वाहत आहे. गांधीग्राम येथील उंच असलेल्या महादेवाच्या पिंडीवरूनही पुराचे पाणी वाहत असून आसपासच्या सर्व शेतात व अनेक गावातही पाणी शिरले आहे.
पावसामुळे तेल्हारा येथून अकोला व शेगावची वाहतूक कालपासून बंद झाली आहे. अकोला शहरासह जिल्ह्य़ात ४८ तासात झालेल्या पावसाची आकडेवारी अशी- अकोला ९२.२०, बार्शिटाकळी ८९.३०, अकोट ९२.३०, तेल्हारा ७६, बाळापूर ८०, पातूर ११५ व मूर्तिजापूर ८४ मि.मी. पाऊस झाला आहे. संपूर्ण जिल्ह्य़ातील ७५ टक्के पिके नष्ट झाले असून बहुतांश शेतात पाणीच पाणी साचले आहे.  बुधवारपासून या पावसाने संपूर्ण जिल्ह्य़ात कहर केला आहे. काटेपूर्णा धरण आता पूर्ण भरले असून त्याचे १० दरवाजे उघडण्यात येऊन त्यातून ३५८ क्युसेक्स पाण्याचा दर सेकंदाला विसर्ग केला जात आहे. वान धरण तर गेल्याच पंधरवडय़ात ८० टक्क्यावर भरले होते. आता या पावसामुळे ते ८५ टक्के भरले असून त्याचेही ६ दरवाजे उघडले आहेत. पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मोर्णा १००, दगडपारवा ७४ टक्के भरले, तर निर्गुणा व उमा ही धरणे पूर्ण भरली आहेत. दगडपारवा धरण मुख्यत: अकोल्याच्या पुराशी निगडित आहे. अकोल्यास १० वर्षांपूर्वी आलेल्या भयानक पुरात दगडी पुलाचे सारे दगड वाहून गेले होते. त्यानंतर आमदार गोवर्धन शर्मा यांनी पुढाकार घेऊन अकोल्यास पुरापासून वाचविण्यासाठी कोठे धरण बांधले जाईल, याची पाहणी करण्याचे सरकारला आवाहन करून यासाठी स्वत: मोहीम राबविली. परिणामी, दगडपारवा येथील धरण झाल्यावर अकोल्यास पुराची झळ बसली नव्हती.   शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या मोसमात तिसऱ्यांदा मोर्णेचे पाणी दगडी पुलाच्या अगदी जवळून वाहत आहे. प्रवाहापासून पूल २ फूट उंच राहिला आहे. या सर्वच धरणांच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले असल्याने, तसेच ठिकठिकाणी नदी, नाले भरून वाहू लागल्याने पाणीच पाणी चहूकडे, अशी जिल्ह्य़ात अवस्था झाली आहे.  साथीचे रोग पसरले असून रुग्णालये भरली आहेत. ग्रामीण भागातील रस्ते वाहतुकीसाठी धोक्याचे ठरत आहेत. अकोला शहरात रस्त्यावर पाण्याचे तलाव निर्माण झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शहरात कुठेच सांडपाण्याचे नियोजन नसल्याने घाणही रस्त्यावर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा