पहाटे पाच वाजतापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने देवरी तालुक्याच्या उत्तर भागात कहर केला आहे. अव्याहतपणे सुरू असलेल्या पावसामुळे अनेक तलाव दुथडी भरुन वाहू लागले आहे. परिणामी, नाल्यांमधून वाहणारे पाणी पुलावर चढल्यामुळे आमगाव-देवरी मार्गावरील वाहतूक दुपारी अकरापासून बंद झाली. सावली गावात तळ्याच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी गावात शिरल्याने नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
परिस्थिती हाताळण्याकरिता तालुका प्रशासन तळ ठोकून सावली आणि पंढरपूर येथे आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्य़ातील जोरदार पावसाने देवरी तालुक्याच्या उत्तर भागात संततची हजेरी लावली. या संततधार पावसामुळे अनेक तलावांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सांडव्यावरून पाणी वाहत आहे. सावली येथील अंधरबन तलाव तुडुंब भरले आहे. २००६ मध्ये या तलावाची पाळ फु टून पंढरपूर आणि सावली या गावांमध्ये पाणी शिरले होते. तिच स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देवरी मार्गावरील सावली, वडेगाव, डवकी या नाल्यांच्या पुलावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. बांध्यामध्ये पाणीच पाणी साचल्यामुळे रोवणीची कामे बंद होती. पंढरपूर, सावली, गोटाबोडी, शिलापूर आदी गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार पटले, तलाठी पटले यांनी परिस्थितीची पाहणी केली. धोक्याची स्थिती असल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याचे देवरीचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा