गेले काही दिवस मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्य़ातील शहरी तसेच ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले असून कल्याणपल्याड उल्हास आणि वालधुनी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून काही वस्त्यांमध्ये बुधवारी पाणी शिरले होते. मात्र कल्याण परिसरात वारंवार निर्माण होणाऱ्या पूरसदृश परिस्थितीस पाऊस नव्हे तर या भागातील बेसुमार अनधिकृत बांधकामेच कारणीभूत आहेत. याच परिस्थितीमुळे दरवर्षी या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.
श्रीमलंग डोंगररागांमध्ये उगम पावून अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण शहरांतून वाहणाऱ्या या एकेकाळच्या गोडय़ा पाण्याच्या नदीचे आता चक्क सांडपाण्याच्या नाल्यात रूपांतर झाले आहे. नदीचे मूळ पात्र ८० मीटर रुंद होते. अंबरनाथ शहरात आता ते अवघे २० मीटर तर उल्हासनगरमध्ये तर चक्क अवघ्या सहा मीटर रुंदीच्या गटाराची अवकळा नदीला आली आहे. मुंबईच्या मिठी नदीच्या धर्तीवर वालधुनी प्राधिकरण स्थापून नदीचे संवर्धन करण्याची योजना एमएमआरडीएने आखली असली तरी अद्याप केवळ सर्वेक्षणावरच ते थांबले आहे. वालधुनी नदीला हजारो झोपडय़ांनी अक्षरश: विळखा घातला असून ती कोंडी कशी दूर करायची, हा प्रश्नच आहे. वालधुनीबरोबरच उल्हास आणि काळू नदीकाठीही अतिक्रमणे वाढत असून त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरते. विशेष म्हणजे जुलै २००५च्या आपत्तीचा अनुभव या परिसरातील नागरिक दरवर्षी घेत आहेत. वालधुनीप्रमाणेच ठाणे जिल्ह्य़ातील पाणीपुरवठय़ाचा महत्त्वाचा स्रोत असणाऱ्या उल्हासचे पाणीही नदीकाठच्या वस्त्यांमध्ये शिरू लागले आहे. उल्हास नदीचा तीन किलोमीटर लांबीचा प्रवाह बदलापूर शहरातून वाहतो. नदीच्या पूररेषेचे उल्लंघन करून अनेक बांधकामे झाल्याने अतिवृष्टीच्या काळात ही परिस्थिती उद्भवते.
गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरदऱ्यातून वाहणाऱ्या काळू नदीला महापूर आला आहे. टिटवाळ्याजवळ रूंदे गावाजवळील पूलावरून सोमवारी रात्रीपासून पुराचे पाणी वाहात आहे. त्यामुळे परिसरातील गावांचा टिटवाळा भागाशी असलेला संपर्क तुटला आहे. टिटवाळा परिसरातील रूंदे, मढ, फळेगाव, आंबिवली, उशीद, पळसोली, काकडपाडा, हाल आदी गावांचा टिटवाळा परिसराशी रस्ते मार्गाने असणारा संपर्क पुलावरील महापुरामुळे तुटला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा