पारसिक बोगदा (मुंब्रा) ते दिवा-कोपर रेल्वे मार्गाच्या पूर्व बाजूला एक रस्ता तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम करताना या भागातील नाले, लहान प्रवाह बंद करण्याचे काम भूमाफियांकडून सुरू असल्याने पावसाळ्यात दिवा-डोंबिवली परिसर जलमय होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून दिवा ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान वाळू माफियांनी बेकायदेशीरपणे वाळू काढून खाडीचा भाग कोपर भागापर्यंत उकरून काढला आहे. त्यामुळे खाडीचे पाणी कोपर गावापर्यंत पोहोचेल, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. जिल्हाधिकारी म्हणून के. वेलारासू यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून अनधिकृत वाळू उपसा थांबला आहे. असे असले तरी पूर्व बाजूला नवे संकट उभे ठाकले आहे. कोपर रेल्वे स्थानक ते पारसिक बोगद्यादरम्यान रेल्वे मार्गालगत रस्ता तयार करण्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. खाडी, जलमार्ग, नाल्यांचे प्रवाह बुजवून हे रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे, असे या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे. कोपर ते दिवा रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे मार्गाखालून खाडीकडे जाणारा एक नाला या रस्त्याच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. उल्हास खोऱ्यातील पाणी या भागातून खाडीला मिळते. या नाल्यांचे प्रवाह भूमाफियांकडून बंद करण्यात येत असताना कोणतीही सरकारी यंत्रणा याविषयी ठोस भूमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही लोकप्रतिनिधींनी या भागात मोठय़ा प्रमाणावर जमिनीची खरेदी केली आहे. या जमिनीवर विकास कामे करताना रस्ता पूर्ण व्हावा, असा यामंडळींचा प्रयत्न आहे. मात्र, रस्त्याचे काम करताना नाल्याचा प्रवाह बंद केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा