पद्मशाली विणकर समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव उद्या मंगळवारी मोठया प्रमाणात साजरा होत असून गतवर्षांप्रमाणे यंदाही रथोत्सवावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विजापूर वेशीतील श्री मार्कंडेय मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर सकाळी रथोत्सवास प्रारंभ होणार आहे. दरवर्षी नारळीपौर्णिमेला श्री मार्कंडेय महामुनींचा जन्मोत्सव तथा रथोत्सव साजरा होतो. पूर्व भागातील प्रमुख रस्त्यांवरून वाजतगाजत हा रथोत्सव रात्री दहापर्यंत पुन्हा विजापूरवेशीत श्री मरकडेय मंदिरात विसावतो. यात पारंपरिक लेझीम, टिपरी नृत्य पथके, तेलुगु संस्कृतीचा आविष्कार घडविणारी लोकसंगीत पथके, शक्तिप्रयोग संघ यांचा समावेश असतो.
दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत श्री मार्कंडेय मंदिरावर तसेच ग्रामदैवत सिध्दरामेश्वर मंदिरावर व नंतर रथोत्सवावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल. त्यासाठी पद्मशाली समाजातील प्रतिष्ठित मंडळींना पुष्पवृष्टी करण्यासाठी आमंत्रित केल्याचे आप्पाशा म्हेत्रे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा