सणांच्या दिवसांमध्ये फुलबाजार ते कबुतरखान्यापर्यंतचा परिसर गजबजलेला असण्याची सवय आता तमाम दादरवासियांना झाली आहे. यंदाच्या नवरात्रीत मात्र फुलवाल्यांनी दादरच्या संपूर्ण पदपथावर कब्जा केला आहे, त्यामुळे आता घरापासून स्थानक गाठणाऱ्या दादरकरांना या फुलवाल्यांची अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
दरवर्षी गणेशोत्सव जवळ येऊ लागला की दादरचा फुलबाजार गजबजू लागतो. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक दादरला खास फुले विकत घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे ऐन पावसाळ्यात दादरचा कबुतरखान्यापर्यंतचा भाग फुलांनी खचाखच भरलेला असतो.
यंदा नवरात्रीच्या निमित्ताने शेवंतीच्या वेणीला भरपूर मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन कबुतरखान्यापासून ते थेट शारदाश्रम शाळेपर्यंत या वेणी बनवणाऱ्या महिलांनी पदपथावर ठिय्या मारला आहे.
नेहमीप्रमाणे केवळ वेण्या घेऊन या महिला बसलेल्या नाहीत तर, त्या पदपथावरच वेण्या बनवण्याचे कामही करत आहेत. या वेण्या तयार करण्यासाठी त्यांना आधाराची गरज असते त्यामुळे त्यांनी पेव्हर ब्लॉक्समध्ये खिळा ठोकून त्याचा वापर आधारासाठी केला आहे. त्यामुळे एकदा यांनी त्यांचे बस्तान उठवले की या पदपथावर ठिकठिकाणी खड्डे पडण्याचीही भीती आहे.
पेव्हर ब्लॉक्स हे एकमेकांना जोडलेले असतात, त्यामुळे एका ठिकाणचा ब्लॉक उखडला गेल्यावर शेजारचा ब्लॉकही उखडला जाऊ शकतो.
या महिला एकटय़ा पदपथावर बसत नाहीत तर, त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब असते. त्यांची लहान मुले पदपथावर मुक्त फिरत असतात, ज्यामुळे हा पदपथ पूर्णपणे अडवला जातो. वेण्या बनवण्यासाठी लागणाऱ्या फुलांच्या सडय़ापासून ते त्यांच्या कपडय़ांपर्यंत सर्व गोष्टी या पदपथावर पसरलेल्या असतात. इतकेच नाही तर, जवळपासच्या हॉटेलमधून हे फुलवाले चहापासून ते अगदी गुलाबजामपर्यंत खाण्याच्या सर्व गोष्टीही मागवतात. त्यामुळे त्या खाद्यपदार्थाचे खरकटे आणि कागदांचा कचराही या पदपथावर पडलेला अढळतो. सकाळच्या सुमारास यांच्या लहान मुलांच्या प्रातर्विधीपासून ते कपडे धुण्यापर्यंतचे सर्व सोपस्कार येथेच पार पडतात. त्यामुळे सकाळी कामाला निघणाऱ्या नोकरवर्गाचीही भलतीच पंचाईत होते. या पदपथाला लागूनच आसपासच्या दुकानदारांच्या गाडय़ांची पार्किंगची सोय केलेली असते, त्यामुळे पायी चालणाऱ्यांना चालायचे झाल्यास रस्त्यावरील गाडय़ांना चुकवत ही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. आता नवरात्रीनंतर लवकरच दिवाळीचीही चाहूल लागणार आहे, त्यामुळे दिवाळीपूर्वी हा रस्ता साफ होणार की नाही हा प्रश्न दादरकरांना सतावत आहे.
यासंदर्भामध्ये दादरचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘‘सध्याच्या निवडणुकीच्या गोंधळामुळे आमचे याकडे लक्ष गेलले नाही. पण स्थानिकांची तक्रार असल्यास आम्ही ताबडतोब यावर कारवाई करु.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flowers vendors occupied whole footpath of dadar station in navratri
Show comments