‘यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे म्हंतात
मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलाशयं भरली ना सगळी?
बाकी सगळं खाक झालं तरी आम्हाला काय काळजी?
कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे
काय तरी धार्मिक कारण आहे म्हंतात             
यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे म्हंतात..’
.. कवी संजय कृष्णाजी पाटील यांच्या ‘लेझीम खेळणारी पोरं’ या कवितासंग्रहातील जवळजवळ प्रत्येक कवितेत असा रोखठोक उपरोध, उपहास आणि वक्रोक्ती ठासून भरलेली आहे. त्यांच्या कवितेतलं हे व्यंगात्मक वास्तव रंगमंचावर साकारण्याचं अवघड आव्हान ‘अभिनय, कल्याण’ या नाटय़संस्थेनं स्वीकारलं आणि ‘अस्तित्व’च्या सहयोगानं ते यशस्वीरीत्या पेललंयही. अभिजीत झुंजारराव या तरुण, कल्पक दिग्दर्शकानं याकामी पुढाकार घेऊन सृजनशीलता पणाला लावत ‘लेझीम खेळणारी पोरं’ हे रंगकाव्य त्याच जोशात अन् त्यातील वक्रोक्ती सर्वार्थानं पोहोचवत मंचित केलं आहे.
संजय कृष्णाजी पाटील यांची कविता लोकल ते ग्लोबल अशी सर्वव्यापी आहे. त्यांच्या कवितेत सर्वदूरचे संदर्भ येत राहतात. मग ते कोटी-कोटींच्या आर्थिक घोटाळ्यांसंबंधीचे असोत, नैतिक व सामाजिक भ्रष्टाचाराबाबतचे असोत, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे असोत की स्त्रीजाणिवांचे असोत, किंवा मग जागतिक राजकारणावर टीकाटिपण्णी करणारेही असोत; त्यांच्या सगळ्याच कवितांमधून ही सार्वत्रिकता आढळून येते.
याचा दाखलाच द्यायचा तर ‘हवामान खात्याच्या अंदाजानुसार..’ या कवितेचा देता येईल-
‘हवामान खात्याच्या अंदाजानुसार
चेचेन्यामध्ये मानवतावादाचा पाऊस पडेल
शंभर अट्टल नि:शस्त्र नक्षलवाद्यांची तुकडी
आंध्रातून अमरधाम यात्रेसाठी कूच करेल
सर्वसामान्य भाविकांकडून तुकडीवर होणाऱ्या
संभाव्य गोळीबाराला तोंड देण्यासाठी
शीघ्र कृती दलाची पाच पथके तैनात राहतील..’
.. आता चेचेन्या कुठे आणि आंध्रातले नक्षलवादी कुठे? पण ते समान पातळीवर येतात ते त्यांच्या दहशतवादामुळे!
त्यांची स्त्रीविषयक कविता मात्र या उपरोधी परिघात येत नाही. तिथं ते वास्तवालाच थेट भिडतात. म्हणूनच ‘बाई गं बाई’ कवितेत ते म्हणतात..
‘काळ कुठलाही असो
पटावर तूच उभी
भारतातसुद्धा
महाभारतातसुद्धा..’
.. स्त्रीचं दु:ख, वेदना, सोसणं हा त्यांच्याकरता सहअनुभूतीचा विषय ठरतो. मात्र, तिच्या शक्तीचीही त्यांना पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळेच त्यांच्या ‘पोरी’ या कवितेत ते ठासून सांगतात-
‘पोरी अचानक एकदा उठतील
तर गटागटाने फुटतील
पोरी मग मागे सरायच्या नाहीत
पोरी मग अबला ठरायच्या नाहीत
पोरी भाले बरच्या तलवारी ठरतील
सांभाळा! तुमच्या सरणावरतीही शिरतील’
.. आपल्या कवितेबद्दलचा सार्थ अभिमान कवीला आहे. तिची ताकद तो जाणून आहे-
‘माझ्या कवितेमुळे काहीच फरक पडत नाही
असे कसे म्हणता?
एकतर सर्वदूर पसरण्याच्या प्रक्रियेत्र
ती अडकली असेल, किंवा मग
जिज्ञासूंच्या आस्वादन प्रक्रियेतच काहीतरी घोटाळा असणार’
.. असं ठणकावत असतानाच आपल्या कवितेची ‘ग्लोबल’ ताकद वर्णून ते ‘लोकल’ला येतात. कवी आपल्या कवितेतून जगाची उस्तवार करीत असला तरी त्यालाही त्याचे हितसंबंध असतात. म्हणूनच तो अखेरीस म्हणतो-
‘माझे आणि माझ्या चुलत्याचे
शेताच्या बांधावरून सध्या न्यायालयात जुंपलेले आहे
तूर्तास ते तेवढे निस्तरून घेतो
जागतिक शांततेचे परत बघू कधीतरी.’
.. असं असलं तरी कवीचं भवतालाबद्दलचं भान सतत जागरूक असतं. सामान्य माणसाच्या जगण्यातली कमालीची हतबलता त्याला अस्वस्थ करते. त्याकडेही तो व्यंगात्मक नजरेनंच बघतो. म्हणूनच ‘रांग’ या कवितेत कवी म्हणून जातो की-
‘रेल्वेमृतांच्या यादीमध्ये आपलं नाव नाही ना?
मग राव तेवढीच जगण्याची मजा.
नगरपालिकेचा टॅंकर येणे, आपली दिवाळी
नळाला मुबलक पाणी येणे, आपला राष्ट्रीय सण.’
.. संजय कृष्णाजी पाटील यांची सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक दंभांचा स्फोट करणारी ही कविता रंगाविष्कारित करण्याचा मोह दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव आणि त्यांच्या कलावंत सहकाऱ्यांना न होता तरच नवल! मराठी रंगभूमीवर कवितेच्या सादरीकरणाचे प्रयोग याआधीही झालेले आहेत. पं. सत्यदेव दुबेंनी कुसुमाग्रजांच्या कवितांचा रंगाविष्कार पेश केला होता. जयदेव हट्टंगडी यांनी नारायण सुर्वेच्या कविता मंचित केल्या होत्या. वसंत आबाजी डहाके यांच्या ‘स्वगत- कोसळत्या शतकाचे’ गिरीश पतकेंनी, तर अशोक नायगावकरांच्या कवितांचं ‘नायगावच्या नाक्यावरून’ हे सादरीकरण इरावती कर्णिक यांनी केलं होतं. ही सादरीकरणं कमी-अधिक प्रमाणात यशस्वी झाली होती. काही वेळा कवितांना मूर्तरूप देण्याच्या किंवा त्यांचा अन्वय लावण्याच्या प्रयत्नांत ते फसले होते. तर कधी कलावंतांना ते शिवधनुष्य पेललं नव्हतं. अभिजीत झुंजारराव यांनी मात्र पाटलांच्या कवितांना मूर्तरूप वगैरे देण्याच्या भानगडीत न पडता थेट कविताच त्यातल्या आशयासह लोकांपर्यंत पोहोचावी, हाच प्रधान हेतू ठेवला आहे. आणि त्यासाठी कविता तिच्या गाभ्यासह पचवून तिच्या प्रकृतीनुसार सादर करण्याच्या कलावंतांच्या कौशल्यावर जास्त भर दिला आहे. त्यामुळे ‘लेझीम खेळणारी पोरं’चा प्रयोग परिणामकारकपणे पोहोचतो. होळीच्या वेळच्या पताकांच्या उत्सवी सजावटीच्या पाश्र्वभूमीवर हा आविष्कार सादर होत असल्यानं वर्तमान ‘सेलिब्रेशन संस्कृती’चा संदर्भही त्याला लाभला आहे. पाटलांच्या कवितांमधला उपहास त्याच सुरात व जोशात या आविष्कारात व्यक्त होत असल्यानं त्यातली दाहकता मुखर झाली आहे. कलाकार अलिप्त तटस्थतेनं, परंतु आशयाशी इमान राखून कवितांचं सादरीकरण करत असल्यानं हा परिणाम अधिक गडद, गहिरा होतो. यासाठी दिग्दर्शकानं जाणीवपूर्वक काही मानवी आकृतिबंध योजले आहेत. परंतु त्यात अट्टहास जाणवू नये याचीही खबरदारी त्यांनी घेतली आहे. पाश्र्वभागी होळीचा रंगीन माहोल आणि रंगीबेरंगी झब्बे घातलेली मुलं यांतून एक सुंदर दृश्यात्मकता या आविष्कारास लाभली आहे. लेझीममध्ये एक लय असते. ताल असतो. शिस्तबद्धता असते. नृत्यातली नजाकत असते. माणसाच्या जगण्यालाही तसाच एक ताल व लय असते. पाटलांच्या कवितेलाही एक अंगभूत ताल आहे. लय आहे. परंतु दिग्दर्शकानं या ताल-लयीत न अडकता विधानात्मक (स्टेटमेंट) पातळीवरच त्यांतला आशय अधोरेखित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भ्रष्टाचार, घोटाळे, मानवनिर्मित तसंच नैसर्गिक आपदांतून पार होताना आपल्या अंगभूत लयीतूनच माणसाला प्रतिकूलतेशी जगण्याचं.. झुंजण्याचं बळ मिळत असतं. प्रकाशयोजनेचा अप्रतिम वापर दृश्यात्मक सौंदर्य खुलवण्यासाठी केला गेला आहे. यातले सर्व कलाकार जीव तोडून या आविष्कारात सामील झाले आहेत. त्यांची यत्ता कमी-जास्त असेल; पण त्यांनी कुठंही आशयाचा पदर सोडलेला नाही. नेहा अष्टपुत्रे, सोनाली मगर, दुर्गेश बुधकर, केतन फड, रोशन मोरे, जयेश काळसे, श्रेयस मेश्राम असे सगळेच कलावंत लक्षवेधी आहेत. त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणामुळेच प्रयोग संपला तरीही मुक्तछंदातलं हे दंभस्फोटाचं काव्य काना-मनात गुंजत राहतं.                    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा