‘दलित मित्र’ म्हणून गौरविण्यात आलेल्या त्याच्या वडिलांनी ‘इस्टेट’ म्हणून त्याच्या हातात जणू लोककला सोपविली आणि अफाट संपत्ती, किंमती मालमत्ता सांभाळावी तसा तो जीवापाड ते धन जपतोय. त्याची ही ‘श्रीमंती’ च वेगळी आहे. मालेगावच्या गोरवाडकर वाडय़ातल्या अनेक ‘देखण्या’, दुर्मिळ लोककलेशी निगडीत कार्यक्रमांचा साक्षीदार असणारा हा तरुण त्याच्या त्या उमेदीच्या काळात कदाचित मुलींच्या पाठीमागे फिरला नसेल पण लोककलेशी ‘सूत’ जमावे म्हणून त्याने खूपच धडपड केली. त्याच्या मनातही ‘सुंदरा’ भरली पण ती ‘लोककला’ नावाची. आज सर्वत्र पाश्चात्य संस्कृतीचे, संगीताचे थेट आक्रमण होत असताना मराठी लोककला जगली पाहिजे, टिकली पाहिजे. लोककला सर्वांपर्यंत पोहचली पाहिजे यासाठी तो प्रयत्नशील आहे. खरं तर त्याचं नाव विनोद पण हे सर्व तो मोठय़ा गांभीर्याने करतो. ‘आम्ही चालवू हा वारसा’ असे म्हणत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मालेगाव शहरात लोककलांच्या आविष्कारासह सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्सव साजरा करणारा लोककलेचा सच्चा उपासक म्हणजेच विनोद गोरवाडकर होय.
दहावीत असताना वयाच्या पंधराव्या वर्षांपासूनच लोककलेविषयी त्याच्या मनात आस्था निर्माण झाली. लोककलावंतांविषयी मनात आदरभाव निर्माण झाला. त्याच्या वडिलांना कला येत नव्हत्या तरी कलावंतांच्या समस्या सोडविण्यात त्यांनी आयुष्य खर्ची घातले. शाहीर पिराजीराव नाईकांचा सत्कार त्यांच्या वाडय़ात झालेला. त्यावेळी ‘ही रात्र शाहिरांची’ हा दोनशे शाहिरांचा अफलातून कार्यक्रम विनोदने शालेय जीवनात अनुभवला आणि तेव्हापासूनच लोककलेने त्याच्या मनावर मोहिनी घातली. ज्या वयात मुले महाविद्यालयीन जीवनात वेगळा गोंधळ घालताना, झोपाळ्यावाचूनी झुलताना दिसतात, त्या वयात गोरवाडकर महाशय लोककलेचा अविभाज्य घटक असणारा गोंधळ व पोवाडय़ांचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्यात गुंतले होते. तेव्हापासून आजपर्यंत अव्याहतपणे, निष्ठेने गोरवाडकर वाडय़ात तब्बल अठरा वर्षे सांस्कृतिक मेजवान्या झडत आहेत. कलेच्या मनोहारी आविष्कारांची मुक्त उधळण होत आहे. महाराष्ट्रातील मान्यवर लोककलावंतांची मांदियाळी विनोदच्या मनापासूनच्या प्रयत्नातून त्यांच्या ‘एकता सांस्कृतिक मंच’ च्या माध्यमातून मालेगावात अवतरते आहे. वडिलांचा स्मृतीदिन लोककलेशी निगडीत दर्जेदार कार्यक्रमांनी साजरा करून ही कला सर्वदूर पोहचविण्याची विनोदची धडपड अचंबित करून टाकणारी आहे.बदलत्या जमान्यात वडिलांच्या आठवणी जपत दरवर्षी त्यांना सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमातून आगळी आदरांजली वाहणारा हा लोककलेचा वारकरी विरळाच. शाहीर विठ्ठल उमपांपासून भारूडकार चंदाबाई तिवारींपर्यंत आणि रागदारीवर लावणी गाणाऱ्या ज्ञानोबा उत्पातांपासून परातींवर नृत्य सादर करणाऱ्या बीडच्या राजू बाबांपर्यंत, अगदी सर्वानी विनोद गोरवाडकरांच्या अंगणात आपली अदाकारी सादर केली आहे. स्वखर्चातून, एकता च्या सहकार्यातून विनोदचा हा उपक्रम लोककलेविषयी जनमानसात जागृती निर्माण करणारा ठरत आहे.
हे सर्व करीत असताना अर्थकारण आड येते. घर, कुटुंब सांभाळताना तशी दमछाकच होते. पण विनोदने समाजकारण महत्वपूर्ण मानून परिस्थितीशी संघर्ष करत चिकाटीने आपल्या अंगणातला उत्सव, वाडय़ातील ‘सांस्कृतिकी’ टिकवून ठेवली याचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. विनोदने स्वत: पीएचडी केली आहे. नाशिकच्या पंचवटी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्याने यापूर्वी कामही केले. असा हा चतुरस्त्र माणूस लोककलेशी समरस होत स्वत: हातात हार्मोनिअम व तबला घेऊन गाणे म्हणताना दिसतो. ओवी, भारूड, गवळण, अभंग, गोंधळ इत्यादी गोड गळ्याच्या कवी कमलाकर देसलेंना बरोबर घेऊन ‘कविता मनातली, गाणी जनातली’ हा कार्यक्रम शाळा, महाविद्यालये, विविध संस्थांच्या कार्यक्रमात सादर करतो. दाद मिळवतो व लोककलेशी नाते जुळल्याचा अभिमान आनंदाने व्यक्त करतो. गणेशोत्सवातील उपक्रमात दरवर्षी एक हिंदू व एक मुस्लीम कलावंताचा एकत्रित सत्कार करून विनोद मालेगावात राष्ट्रीय एकात्मताही जपतो. एक चांगला संपादक, निष्ठावंत पत्रकार म्हणूनही त्याचा लौकीक आहे. याची साक्ष ‘नगारा’ या त्याच्या साप्ताहिकातून, दिवाळी अंकातून पटल्याशिवाय रहात नाही. अभिजात शास्त्रीय संगीतावरील कार्यक्रम आयोजित करणारा कलासक्त विनोद रोटरी क्लबच्या माध्यमातून मालेगावात छानसे उद्यान उभारण्यातही पुढाकार घेतो. नर्मदा बचाव आंदोलनात मेधा पाटकांरांचा साथी म्हणूनही प्रत्यक्ष कामात सामील होतो. दिंडी लोककलांची यासह, विनोदाई, नर्मदा घाटी अशी पुस्तके लिहून साहित्यिकांच्या दरबारातही दिमाखाने त्याने स्थान मिळविले आहे. विविध मानाचे पुरस्कार मिळवूनही ‘मी काही मोठा नाही’ असे नम्रपणे सांगणारा हा गोविंदराव गोरवाडकरांचा पुत्र म्हणजे ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ याचा साक्षात पुरावाच ठरावा. अशा या लोककलेच्या उपासकाला भेटण्यासाठी मालेगावच्या गोरवाडकर वाडय़ाला एकदा तरी भेट द्यावयास हवी.
लोककलेचा उपासक
‘दलित मित्र’ म्हणून गौरविण्यात आलेल्या त्याच्या वडिलांनी ‘इस्टेट’ म्हणून त्याच्या हातात जणू लोककला सोपविली आणि अफाट संपत्ती, किंमती मालमत्ता सांभाळावी तसा तो जीवापाड ते धन जपतोय. त्याची ही ‘श्रीमंती’ च वेगळी आहे. मालेगावच्या गोरवाडकर वाडय़ातल्या अनेक ‘देखण्या’,

First published on: 16-07-2013 at 08:57 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Folk worship