स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या अटकेमुळे लोकसभा निवडणुकीचे राजकारण नव्या वळणावर पोहोचू लागले आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीची मुलूख मैदानी तोफ सदाभाऊ खोत यांना उतरविण्याच्या जोरदार हालचाली सुरू असताना त्यांना अटक झाल्याने उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विरोधकांनी याच मुद्दय़ावरून खोत यांना घेरण्याच्या हालचाली सुरू केल्या असताना महायुतीत समाविष्ट झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने माढा मतदार संघावर अगोदरच हक्क सांगितला असून खोत यांच्यावरील कारवाईमुळे त्यांच्या मागणीला आणखी जोर चढला आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी मात्र जिवश्च मित्र सदाभाऊ खोत यांची उघडपणे पाठराखण करण्याची भूमिका घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपाने बेरजेचे राजकारण करीत शेतक-यांमध्ये प्रबळ स्थान असलेल्या खासदार राजू शेट्टी व माढा मतदारसंघात गतवेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या विरोधात उमेदवारी लढविलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर या दोघांना महायुतीत सामावून घेतले आहे. तर रिपाइं अगोदरपासून युतीशी हातमिळवणी करून राहिला आहे. जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्यावर माढाचा तिढा हा महायुतीमध्ये मिठाचा खडा बनला आहे. जानकर यांनी माढा मतदारसंघावरील आपला हक्क ठणकावून सांगण्यास सुरुवात केली आहे. तर महायुतीकडून दोन जागा मिळालेल्या स्वाभिमानीने दुसऱ्या जागेसाठी माढा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी गेले काही वर्षे स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत माढामधील संपर्क वाढवत राहिले आहेत. माढा स्वाभिमानीकडे की जानकरांकडे हा वाद सुरू असताना आता अचानक सदाभाऊ खोत यांना अटक झाल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
धुळे येथील साक्री तालुक्यात दूध उत्पादक शेतक-यांना कर्जवाटप करण्याचे प्रकरण सन २००९ मध्ये घडले होते. सदाभाऊ खोत अध्यक्ष असलेल्या देवकीनंदन दूध डेअरीच्या माध्यमातून कर्जवाटप झाले होते. याप्रकरणात गैरव्यवहार घडल्याचे उघडकीस आल्याने त्याची चर्चा सुरू झाली. प्रारंभी पोलीसांनी तक्रारकर्त्यांची दखल घेतली नव्हती. मात्र त्यांनी न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाच्या आदेशामुळे पोलिसांना खोत यांना अटक करावी लागली. प्रथम एक दिवसाची तर नंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिल्याने शेतक-यांची बाजू उचलून धरणाऱ्या सदाभाऊंचे हात पशू घोटाळ्यात चांगलेच अडकत चालल्याचे दिसत आहे.
सदाभाऊ अडचणीत येत असल्याचे पाहून विरोधकांनी त्यांच्या शेतकरी हिताच्या भूमिकेवर टीका चालविली आहे. शेट्टी यांच्या विरोधात श्रीमती निवेदिता माने यांनी नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात शेट्टी व खोत यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. तर दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाने माढावरील आपला हक्क आणखी मजबुतीने सांगण्यास सुरुवात केली आहे. माढा मतदारसंघ मिळणार नसेल तर राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याची निकराची भूमिका पक्षाचे कार्यकर्ते मांडू लागल्याने महायुतीच्या ऐक्याला तडा जाण्याची शक्यताही जाणवत आहे. अशाही स्थितीत खासदार राजू शेट्टी यांनी मात्र सदाभाऊ खोत यांची खंबीरपणे पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय दबावातून सदाभाऊ खोत यांना पोलीसी कारवाईत अडकविण्याचे षड्यंत्र सत्ताधा-यांनी आखले असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. या कथित अपहार प्रकरणात अन्य लोक सहभागी असताना त्यांना वगळून केवळ सदाभाऊनांच कायद्याच्या कचाटय़ात कसे पकडले जात आहे, असा प्रतिप्रश्नही त्यांच्याकडून केला जात आहे. सदाभाऊ दोषी असल्याचे सिध्द झाल्यास सार्वजनिक जीवनातून बाजूला जाण्याचा निर्धार बोलून दाखविणाऱ्या शेट्टी यांनी काही झाले तरी सदाभाऊंना माढा मतदारसंघ मिळवून देऊन निवडून आणण्याचे आव्हान पेलण्यास समर्थ असल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व घडामोडी पाहता सदाभाऊंचे अटकेचे प्रकरण राजकीय पटलावर वादाचे मोहोळ उभे करताना दिसत आहे.
सदाभाऊ खोत यांच्या अटकेमुळे राजकारण नव्या वळणावर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या अटकेमुळे लोकसभा निवडणुकीचे राजकारण नव्या वळणावर पोहोचू लागले आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीची मुलूख मैदानी तोफ सदाभाऊ खोत यांना उतरविण्याच्या जोरदार हालचाली सुरू असताना त्यांना अटक झाल्याने उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-01-2014 at 03:50 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Follow the new politics arrested of sadabhau khot