उसापेक्षा साखरेचे बाजारभाव जास्त हे चित्र कायम राहिल्यास साखर कारखाने बंद पडतील, अशी भीती व्यक्त करतानाच साखर उद्योग नियंत्रणमुक्त झाल्यासच शेतकऱ्यांना योग्य भाव देणे शक्य होईल, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले. साखरेवरील नियंत्रण हटविण्यासाठी केंद्र सरकारकडे सी. रंगराजन समितीचा प्रस्ताव मंजूर होण्याबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही मुंडे यांनी या वेळी दिली.
दुष्काळी स्थितीत पाण्याचे योग्य नियोजन न केल्यानेच टंचाईचे भयावह चित्र निर्माण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद तालुक्यातील चित्तेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजीराजे कारखान्याच्या (दिनदयाळनगर) सहवीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन खासदार मुंडे यांच्या हस्ते झाले. कारखान्याचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार रावसाहेब दानवे, नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, उद्योगपती राम भोगले, माजी आमदार संदीपान भुमरे, सिद्धेश्वर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश बनकर, माजी आमदार रामभाऊ गावंडे व सांडू पाटील लोखंडे आदी उपस्थित होते.
कमी वेळेत व खर्चात सहवीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी केल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे कारखान्याचे मुंडे यांनी या वेळी कौतुक केले. या प्रसंगी भोगले, ठोंबरे, खोतकर, दानवे आदींनी साखर कारखान्यांपुढील अडचणी मांडल्या. तसेच साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्यासाठी रंगराजन समितीचा अहवाल केंद्राने मान्य करावा, या दृष्टीने मुंडे यांनी प्रयत्न करण्याचा आग्रह आपल्या भाषणात धरला. कारखान्याचे अध्यक्ष विठ्ठलराव अंबरवाडीकर, उपाध्यक्ष दामोदर नवपुते, संचालक हेमंत जोशी, प्रल्हाद पनाळे, सरव्यवस्थापक डी. ए. बडदे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कामगार यावेळी उपस्थित होते.

Story img Loader