राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात केल्यास जीवनातील आनंदाचा मार्ग मोकळा होतो, असे विचार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले. ते आर्णी तालुक्यातील गवळा येथील श्री गुरुदेव सवरेदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मोघे यांच्या हस्ते श्री गुरुदेव विद्या मंदिराच्या प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रसंतांच्या विचारातून व्यसनमुक्तीला बळकटी येऊ शकते, तेव्हा व्यसनमुक्त, सुसंस्कृत आणि सशक्त समाज निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी भाषणातून व्यक्त केली.
संतांनी अनेक महत्त्वाचे मार्ग आपल्याला सांगितले आहेत. त्यांचा अवलंब आपण केल्यास त्यातून जगण्याचा आगळा आनंद आपल्याला मिळू शकतो. आज व्यासपीठावर तुमच्यासमोर दिसत असले तरी त्यात प्रमुख भूमिका राष्ट्रसंतांच्या शिदोरीतून मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माजी खासदार सदाशिव ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, माजी प्राचार्य शंकरराव सांगळे, अॅड. आशीष देशमुख, डॉ. टी.सी. राठोड, डॉ. बी.ए. इंगोले, पंचायत समिती सभापती राजू विरखडे, तालुका समन्वय समिती अध्यक्ष साजीद बेग उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर सदाशिव ठाकरे, प्रा. वसंत पुरके, डॉ. इंगोले आदींनी मार्गदर्शन केले. प्रा. शंकरराव सांगळे यांनी मात्र संत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी संस्थेचे शिल्पकार दादासाहेब सोळंके यांचा सत्कार करण्यात आला.
गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाने सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात झाकी दर्शन, ग्रामगीता ग्रंथदिंडी, पुतळा अनावरण सोहळा, प्रतिबिंब स्मरणिका प्रकाशन सोहळा, तालुकास्तरीय भव्य खंजिरी स्पर्धा, शालेय सांस्कृतिक महोत्सव, विद्यार्थी स्नेहसंमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अशा विविध कार्यक्रमाने या गावात ज्ञानगंगा अवतरली होती. सहा दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमाचा समारोप आमदार वसंतराव खोटरे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच माजी राज्यमंत्री संजय देशमुख, खासदार हंसराज अहीर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, भारत स्काऊट गाईड संघटना उपआयुक्त दीपकराव दोंदल, प्रताप राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष गणेश मोरे होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा