शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या दारात या संकल्पनेनुसार कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), महाराष्ट्र शासनाचा कृषी व पणन विभाग, जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या वतीने सहा ते आठ एप्रिल या कालावधीत येथे फळे, भाजीपाला व धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी सलग तीन वर्षे नाशिक येथे धान्य महोत्सव यशस्वी झाला असून प्रत्येक वेळी दीड ते दोन कोटी रुपयांच्या शेतमालाची विक्री करण्यात आली होती. चौथ्यांदा होणाऱ्या धान्य महोत्सवात गहू, बाजरी, नागली, ज्वारी, हरभरा, मूग, उडीद, कुळीथ, इतर कडधान्ये, सर्व प्रकारची फळे, भाजीपाला तसेच शेतकऱ्यांनी स्वत: प्रक्रिया केलेला शेतमाल विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. शेतकरी गट आणि महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादनेदेखील विक्रीसाठी असतील.
शेतकरी व ग्राहक यांमधील दलालांची साखळी कमी करून शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्यात वाढ करणे आणि ग्राहकांनाही योग्य दरात शेतमाल मिळवून देणे असा दुहेरी उद्देश या महोत्सवाच्या आयोजनातून साधला जाणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, किंवा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याकडे अर्जाद्वारे नोंदणी करावी. गोल्फ क्लब मैदानात होणाऱ्या या महोत्सवात अधिकाधिक शेतकरी व ग्राहकांनी सहभागी होण्याचे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष नागरे व प्रकल्प उपसंचालक बाळासाहेब मुसमाडे यांनी केले आहे.