जिल्हाधिकारी कार्यालय आणि वचन संस्था यांच्यातर्फे आदिवासीबहुल भागात झालेल्या सव्‍‌र्हेक्षणात साक्षरतेचा अभाव आणि जुन्या चालीरीती, परंपरेचा पगडा ही कारणे प्रामुख्याने कुपोषणाला हातभार लावत असल्याचे पुढे आले. संस्थेने ‘कौटुंबिक स्वास्थ्य’ यावर लक्ष केंद्रित ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काय करता येईल, या दृष्टीने अभ्यास सुरू केला. त्याअंतर्गत सभोवताली असणारे विविध अन्नघटक वापरून या वयोगटासाठी योग्य असणाऱ्या आहारकृती तयार करणे या प्राथमिक बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
चिंचओहोळमधील १९ गावांतील ०६ ते ९ महिने यामधील ५९, १० ते १२ महिने वयोगटातील ३७ आणि १३ ते २४ वयोगटातील १२४ अशा एकूण २२० बालकांचा अभ्यास करण्यात आला. यासाठी गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांना सांभाळणारी घरातील महिला मंडळी यांच्यासाठी मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आला. त्या वेळी ६ महिन्यापुढील बालकांना पूरक आहार म्हणून वरील अन्न सुरू करणे गरजेचे आहे, ही मानसिकता या मंडळीची नसल्याचे प्रकर्षणाने जाणवले. सर्व कुटुंब दारिद्रय़रेषेखालील असली तरी त्यांना सरकारी योजनांची माहिती नसल्याने बाळाला काय आणि कसे खाऊ घालायचे याबाबत अनभिज्ञता होती. महिला पोटपाण्यासाठी शेतमजुरी अथवा वनात जाऊन लाकूड तोडण्याची कामे करतात. त्यांचा बराचसा वेळ कामात तसेच चुलीवर स्वयंपाक करण्यात जात असल्याने बाळाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. यामुळे बाळाला सांभाळण्याची जबाबदारी कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती किंवा मोठय़ा भावंडाची असते. बाळाला वरचे अन्न द्यायचे म्हणजे भाकरीचा तुकडा त्याला द्यायचा हा सर्वाचा गैरसमज. तसेच बाळाला हाताळताना स्वच्छता अपेक्षित असते हे त्यांच्या गावीही नाही. त्यामुळे सुरुवातीला झालेल्या बैठकीत उष्टावण संस्कार, याअंतर्गत वर्षभर घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. बाळाला आईचे दूध व पूरक आहार याबाबतच्या समजुती-गैरसमजुती, बाळास पूरक आहारात घरात उपलब्ध घटकांनुसार काय देता येईल याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
वेळोवेळी झालेल्या बैठकीत बाळाला वेगळा आहार दिला जात नाही, मातांकडून बाळांचे दर महिन्याला वजन करून घेतले जात नाही, घरात जे जेवण तयार करतात, तेच बाळाला खाण्यास दिले जाते, शहरी भागांप्रमाणे समृद्ध स्वयंपाकघर नाही, मोजक्याच अन्न घटकांमध्ये मोजक्या पाककृती तयार करणे, मात्र त्यातील पौष्टिक किती त्याबाबत अनभिज्ञता, केवळ आईचे दूध या एकमेव आहारावर बाळाची वाढ अवलंबून असल्याचे बैठकांमध्ये दिसून आले. यामुळे मातेच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करत आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांच्याकडील उपलब्ध तांदूळ, नागली, गहू, शेंगदाणे, गुळ आदी सामानांपासून पौष्टिक आहारकृती तयार करण्याचे प्रशिक्षण संबंधितांना देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा