साक्री तालुक्यातील निम्न पांझरा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्वरित करावे, निकाल लागलेल्या खटल्यानुसार भरपाई द्यावी, या मागण्यांसाठी बुधवारपासून अक्कलपाडा धरणग्रस्त कृती समितीतर्फे सिंचन भवनासमोर बेमुदत अन्न सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली नसल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष सुभाष काकुस्ते यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी आणि मध्यम प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निम्न पांझरा प्रकल्पामुळे तामसवाडी, वसमार, सय्यदनगर ही गावे पूर्णत: बुडीत क्षेत्रात, तर अक्कलपाडा, चिंचखेडा, इच्छापूर ही गावे अंशत: बुडीत क्षेत्रात येतात. या गावांचे पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाच्या घळभरणीचे काम पूर्ण करता येणार नाही. आधी पुनर्वसन नंतर धरण या तत्त्वाप्रमाणे अनेक बैठकांमधून शासनाची भूमिका वारंवार अधोरेखित झाली आहे, परंतु धरणाची घळ भरणी झालेली नसल्याची तांत्रिक वास्तवता लक्षात न घेता धरणाची घळ भरणी शिल्लक ठेवलेलीच नाही. फक्त द्वार उघडे ठेवले म्हणून पूर्णत: जलसाठा झाला नाही. सय्यदनगर व तामसवाडी ही पूर्णत: स्थलांतरित न झालेली गावे बुडण्यापासून वाचली आहेत. त्यामुळे आता सनदशीर मार्गाने मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अन्न सत्याग्रहाचा निर्णय घेतला असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
लोकन्यायालय तसेच विविध न्यायालयीन दाव्यात निकाल लागलेल्या प्रकरणांमध्ये भरपाईची रक्कम त्वरित मिळावी, निकालानंतरही प्रकल्पग्रस्तांना त्रास देण्याचे प्रकार बंद करावेत, पूर्णपणे बुडीत तीन गावांच्या अपूर्ण नागरी सुविधाची कामे पूर्ण करावी, शेतमजूर-भूमिहिनांना प्रकल्पाच्या खर्चाने लाभदायक क्षेत्रात पुनर्वसन कायद्यातील तरतुदीनुसार शेती मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या असल्याचे काकुस्ते, भिकन सोनवणे, गुलाब चव्हाण, निंबा पाटील आदींनी म्हटले आहे.
अक्कलपाडा धरणग्रस्तांचा अन्न सत्याग्रह
साक्री तालुक्यातील निम्न पांझरा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्वरित करावे, निकाल लागलेल्या खटल्यानुसार भरपाई द्यावी
First published on: 03-01-2014 at 06:54 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food satyagraha by akkalpada dam victims