उद्यापासून जिल्ह्य़ात सुरू होणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेचा जिल्हय़ाच्या ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के, तर शहरी भागातील ४५.३४ टक्के नागरिकांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे, अशी माहिती जिल्हय़ाचे पालकमंत्री संजय देवतळे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे, खासदार हंसराज अहिर, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प संचालक वीरेंद्र तिवारी, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, सहाय्यक जिल्हाधिकारी आशुतोष सलील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्य़ात ३१ जानेवारीला राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा शुभारंभ होणार असून २०११ च्या जनगणनेच्या आधारे जिल्ह्य़ाच्या शहरी भागातील ४५.३४ टक्के आणि ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के नागरिकांना २ रुपये प्रतिकिलो गहू, ३ रुपये प्रतिकिलो तांदूळ आणि १ रुपया प्रतिकिलो भरडधान्य (ज्वारी, बाजरी, मका) सवलतीच्या दराने वितरित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयाचा व योजनांचा आढावा घेतांना पालकमंत्री म्हणाले की, शासनाने विजेचे दर २० टक्के कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी व महिली सक्षमीकरणासाठी याच महिन्यात सुकन्या योजना सुरू केली आहे. सुवर्ण जयंती राजस्व अभियानात मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने राबवला आहे. ग्रामीण भागात शिक्षणाकरिता गावापासून दूर जाणाऱ्या ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिलांना व मुलींना सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उचललेले हे पाऊल अभिनंदनीय आहे.
त्याचप्रमाणे या अभियानातंर्गत २७३ गावांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात आले असून २८ हजार दाखल्यांचेही वाटप करण्यात आले आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्येला आळा घालण्यासाठी शासनाने नवा सावकारी कायदा तयार केला असून या आदेशास राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली आहे. या ऐतिहासिक अद्यादेशामुळे सावकाराकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिळवणुकीस निश्चितच प्रतिबंध बसणार आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २१ नोव्हेंबरपासून राज्याच्या सर्व जिल्ह्य़ांमध्ये कार्यान्वित झाली आहे. या योजनेचे आरोग्य पत्र वितरणाचे सर्व जिल्ह्य़ात महा ई-सेवा केंद्र व ग्राम पातळीवर संग्राम केंद्रामार्फत सुरू आहे. शहरी भागात या केंद्राची संख्या कमी असल्यामुळे २६ जानेवारीपासून आरोग्य पत्र टपाला कार्यालयातून देण्याची सेवा शासनाने सुरू केली. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही देवतळे यांनी केले आहे. सोबतच शासनाच्या विविध विभागाने केलेल्या विकास कामाचा आढावाही त्यांनी भाषणात घेतला.  
विदर्भाच्या कला व सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी व या भूमितील कलाकारांना वाव देण्यासाठी नागपूर येथे विभागीय सांस्कृतिक कार्यालय हिवाळी अधिवेशनात सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून विदर्भातील सांस्कृतिक व कला क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास देवतळे यांनी व्यक्त केला. सोबतच माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या मुल येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकासाठी शासनाने ४ कोटी ९० लाख ७४ हजार रुपयाच्या निधीस मंजुरी दिली असून या निधीतून जिल्ह्य़ाला भूषण ठरेल, असे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे देवतळे यांनी सांगितले.
पोलीस मदानावर झालेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री देवतळे यांनी परेडची पाहणी केली. विविध पथकांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी विविध पुरस्कार विजेत्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परेडचे संचालन उपविभागीय पोलीस अधिकारी सीमा अहिरे यांनी केले. जि. प. अध्यक्ष संतोश कुंभरे, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीकक्ष कार्यालयात राजीव जैन, प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Story img Loader