तलावांचे शहर म्हणून एकेकाळी नावाजल्या गेलेल्या ठाणे शहरातील तलावांच्या देखभाल तसेच सुशोभीकरणासाठी महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने काही मोजके अपवाद वगळता बहुतांश तलावांना प्रदूषणाचा विळखा बसू लागला आहे. मासुंदा, मखमली, कचराळी या शहरातील केंद्रस्थानी असलेल्या तलावांच्या सुशोभीकरणासाठी लक्षावधी रुपयांचा खर्च केला जातो. इतरत्र मात्र निधीच्या कमतरतेमुळे तलावांची दूरवस्था होत चालली आहे. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने उशिरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली असून शहरातील तब्बल ३६ तलावांच्या सुशोभीकरण आणि संवर्धनासाठी तब्बल ६५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा निधी उभारण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून कर्ज काढण्यात येणार असून केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
ठाण्यातील सर्व तलावांचे पर्यावरण चांगले राखले जावे यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता शहरातील वेगवेगळ्या पर्यावरण संस्थांनी यापूर्वी व्यक्त केली आहे. या तलावांच्या सुशोभीकरण आणि संवर्धनाची जबाबदारी महापालिकेकडे असून हे काम प्रभावीपणे केले जात नाही, अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी यापूर्वी पुढे आल्या आहेत. पाचपाखाडी परिसरातील महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या कचराळी तलावात मध्यंतरी लगतच असलेल्या स्वच्छतागृहातील सांडपाणी सोडले जात असल्याची तक्रार या भागातील नगरसेवकांनी केल्याने एकच खळबळ उडाली होती. शहराच्या मध्यभागी असलेल्या मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिका वेळोवेळी प्रयत्न करत असते. मात्र, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून तलावात कचरा टाकणे, परिसर अस्वच्छ करणे असले प्रकार होत असल्याने या तलावाच्या देखभालीसाठी महापालिकेस दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. ठाणे महापालिकेने मध्यंतरी शहरातील प्रमुख तलावांच्या सुशोभीकरणाचा कार्यक्रम हाती घेत त्यासाठी काही कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार देखभाल आणि दुरुस्तीची कामे मध्यंतरी मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आली.
दरम्यान, शहरातील सर्वच तलावांच्या सुशोभीकरणासाठी दूरगामी अशी योजना आखण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी सुमारे ६५ कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पात तब्बल ३६ तलावांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये मासुंदा, कचराळी, हरियाली, मखमली, उपवन अशा प्रमुख तलावांचाही समावेश करण्यात आला आहे. तलावातील पाण्याचे सुशोभीकरण, कारंजे उभारणे, बायो रेमेडिएशन अशा स्वरूपाची कामे करण्यात येणार असून काही ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने अॅम्पी थिएटरसारखे प्रकल्प उभारण्याचा प्राथमिक आराखडा अभियांत्रिकी विभागाने तयार केला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून तलावांच्या संवर्धनासाठी निधी मिळावा, अशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असला तरी राज्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून कमी व्याज दराने निधी उभारण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. याशिवाय एखाद्या खासगी बँकेकडून अल्प व्याजदराने तलावांसाठी कर्ज मिळते का, याची चाचपणीही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी वृत्तान्तला दिली.