शहरासाठी आम्ही सुचविलेल्या अक्कलपाडा ते हनुमान टेकडी जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीसाठी महापालिकेतील शिवसेनेच्या सर्व १८ नगरसेवकांनी आपल्या नगरसेवक निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविल्याचे पत्र आयुक्त जीवन सोनवणे यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते राजेंद्र पाटील यांनी दिली.
यासंदर्भात पाटील यांनी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. पिण्याच्या पाण्याचा विषय हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा म्हणून शिवसेना सुरूवातीपासून प्रयत्नशील असल्याचे पत्रकात म्हटले आहे. शहराला नकाणे, डेडरगाव तलाव व तापी पाणी पुरवठा योजना, या तीन ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो. नकाणे तलाव कोरडा पडला असून सध्या हा तलाव हरणामाळ धरणातील पाण्याने भरण्यात येत आहे. डेडरगाव तलावाचे पाणी मोहाडी व उपनगर या भागापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे या योजनेचा संपूर्ण शहरासाठी उपयोग नाही. तापी पाणी पुरवठा योजना ही जीर्ण व खर्चिक झालेली आहे.
या योजनेवर देखभाल दुरूस्ती आणि येणारे प्रचंड वीज बील प्रशासनाला परवडणारे नाही. शहराला अक्कलपाडा धरणातून जम्बो कालव्याव्दारे पाणी पुरवठा होत आहे. धुळेकरांना पाणी टंचाईला सामोरे जाऊ लागू नये म्हणून आ. शरद पाटलांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन जम्बो कालव्याव्दारे हरणामाळ तलाव भरणे आणि या तलावातून पाटचारीव्दारे पाणी हनुमान टेकडी जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत आणून धुळे शहराला पाणी पुरवठा केला जावा, असे सूचविले.
धुळे शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा म्हणून आपण मुख्यमंत्र्यांसह र्सव संबंधितांना नवीन अक्कलपाडा ते हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची पाणी योजना सूचविली. पाठपुरावा केला. त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा समितीने योजनेस मंजुरी दिली असून प्रस्ताव तयार करून शासनास पाठविण्याचे आदेश देण्यात आल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.
या योजनेसाठी कोणतेही वीज किंवा पाण्याचे बील येणार नाही. अक्कलपाडा धरणातील मृतसाठाही या योजनेसाठी घेण्यात येणार आहे. पाणी नैसर्गिकरीत्या हनुमान टेकडी जलशुद्धीकऱ्ण केंद्रापर्यंत येणार आहे. कारण अक्कलपाडा धरण हे उंचावर असून जलशुद्धीकरण केंद्र उतारावर आहे.
या योजनेसाठी केवळ जलवाहिनीचाच खर्च येणार आहे. यासाठी शिवसेनेच्या सर्व १८ नगरसेवकांनी प्रत्येकी १० लाख रुपये या योजनेसाठी देण्याची तयारी दर्शविली असून आपणांसह अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी आदींनी आयुक्तांना पत्र दिल्याचेही पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.