ऊसदरावरून पुणे जिल्ह्य़ात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर हे चार तालुके अशांत घोषित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सोमवारी दिली. हा आदेश तीस नोव्हेंबपर्यंत लागू असून यामध्ये वाढही होऊ शकते, असे देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे या चार तालुक्यात आता कोणतेही आंदोलन करता येणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून ऊसदरावरून सुरू असलेल्या आंदोलनाचा दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या चार तालुक्यांमध्ये मुंबई पोलीस कायद्यानुसार कोणालाही शस्त्रास्त्रे, प्रक्षोभक भाषणे करता येणार नाहीत. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार आहे.       

Story img Loader