शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तसेच अन्य राजकीय पक्षांकडूनही प्रार्थना, महाआरती सुरू आहे.
सेनेचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे, नगरसेवक अंबादास पंधाडे, तसेच अनेक शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी मनपा कार्यालयाशेजारील पावन गणपती मंदिरात ठाकरे यांना स्वास्थ्य लाभावे यासाठी प्रार्थना केली. सेनेच्या महापौर शीला शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर दिपक सूळ, नगरसेवक संजय चोपडा, गणेश कवडे, अनिल बोरूडे आदी अनेक शिवसैनिकांनी नवीपेठ येथील श्रीराम मंदिरात ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली.
मनसेचे नगरसेवक गणेश भोसले यांनीही भोसले आखाडा येथे गणेश मंदिरात प्रार्थना केली. संतोष भोसले, चंद्रकांत सोनवणे, विनोद भोसले, अनुप काळे, चेतन अग्रवाल, संदीप गायकवाड आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मनसे, तसेच सेनेच्याही अनेक कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत परमेश्वराकडे प्रार्थना करावी, अशा आशयाचे संदेश दिले-घेतले जात होते. कार्यालये, तसेच चौकाचौकांतील टपऱ्यांवर ठाकरे यांच्या प्रकृतीचीच चर्चा सुरू होती.
कर्जतला प्रार्थना
ठाकरेंच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कर्जतला ग्रामदैवत गोदडमहाराज मंदिरात घंटानाद करून प्रार्थना करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम यादव, युवा सेनेचे तालुकाप्रमुख दीपक शहाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक, व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पारनेरला अखंड अभिषेक
पारनेर येथे तालुका शिवसेनेतर्फे हंगे येथील हंगेश्वरास अखंड अभिषेक करण्यात येत आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, तसेच शिवसैनिकांच्या उपस्थितीत अभिषेकास प्रारंभ करण्यात आला. शिवसेनाप्रमुखांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी तालुक्यातही ठिकठिकाणी प्रार्थना करण्यात येत असून काही शिवसैनिकांनी मुंबईकडेही धाव घेतली आहे.

Story img Loader