विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाची अपेक्षा ज्या शिक्षकांकडून केली जाते, त्यांची हजेरी घेण्याची वेळ का यावी असा सवाल पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, तर माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अमित देशमुख, विक्रम काळे व वैजनाथ शिंदे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, की बायोमेट्रीक प्रणाली सरकारच्या विविध कार्यालयांत राबवली जात आहे. वेळेवर उपस्थित राहण्यासाठी या यंत्रणेचा वापर केला जातो. आता ही यंत्रणा शिक्षकांनाही सक्तीची केली जात आहे. अन्य कार्यालयांत ही यंत्रणा ठीक आहे. शिक्षकांना ही यंत्रणा लागू करणे म्हणजे त्यांच्याकडून त्यांचे काम नीट होत नसावे, असे गृहीत धरले आहे. शिक्षक पुरस्काराचे वितरण ५ सप्टेंबरलाच व्हायला हवे. यापुढे हा विलंब खपवून घेतला जाणार नाही. शिक्षणाधिकारी व संबंधित यंत्रणेला या बाबत दोषी धरले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. शाळांना भौतिक सुविधा दिल्यानंतर त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे.  प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा कायदा करण्यात आला. याबरोबरच शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास शिक्षक आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतील, असे मत डॉ. निलंगेकर यांनी व्यक्त केले. लातूर जिल्ह्य़ाने सर्वच क्षेत्रात झपाटय़ाने प्रगती केली. यात जिल्ह्य़ातील शिक्षकांचा वाटा मोठा असल्याचे मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले. आमदार काळे, बनसोडे यांची भाषणे झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा