उत्पन्न व खर्चाची कोणतीही तोंडमिळवणी न करताच कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन उपक्रमाने परिवहन अर्थसंकल्पात उत्पन्नाचे फुगीर आकडे व दहा टक्के कमी खर्च दाखवून अर्थसंकल्पात आठ कोटी ८५ लाखाची तफावत निर्माण केली आहे. दरवर्षी परिवहनच्या उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट होत असूनही परिवहन प्रशासन उत्पन्नाचे फुगीर आकडे दाखवून नेमके काय साध्य करीत आहे. परिवहन सभापती, सदस्य या सगळ्या गोष्टी पाठीशी घालून उपक्रमाला गाळात का घालीत आहेत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
परिवहन उपक्रमाचा २०१३-१४चा अर्थसंकल्प ८८ कोटी ३५ लाख ४३ हजार रकमेचा आहे. परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पात २०१२-१३ मध्ये २८ कोटी ४० लाख उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. प्रत्यक्षात नोव्हेंबपर्यंत ११ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. डिसेंबर ते मार्च या कालावधीत सुमारे ३ कोटी महसूल मिळणार असला, तरी प्रत्यक्षात सुमारे १५ कोटी रुपयेच महसूल उपक्रमाला मिळणार आहे. म्हणजे २८ कोटींचा महसुलाचा इष्टांक गाठणे प्रशासनाला साध्य झालेले नाही.  
सन २०१०-११ मध्ये उपक्रमाचे उत्पन्न १९ कोटी, २०११-१२ मध्ये १७ कोटी आणि २०१२-१३ मध्ये फक्त १५ कोटी होते. उपक्रमाचे उत्पन्न दरवर्षी ५० टक्क्यांनी घटत आहे, असे एका परिवहन विषयातील तज्ज्ञाने सांगितले. गेल्या तीन वर्षांत वाहन दुरुस्ती, निगा खर्च १ कोटी ६५ लाख, २ कोटी २२ लाख आणि ३ कोटी ६० लाखांनी वाढत चालला आहे. २०१२-१३ मध्ये उत्पन्न व खर्चाचा मेळ केल्यावर उपक्रमाच्या तिजोरीत सुमारे १७ कोटी रुपये जमा होणार आहेत. असे असताना प्रशासनाने ३५ कोटी ९५ लाखांचे मूळ अंदाजपत्रक दाखवून धूळफेक केली आहे. गेल्या दोन वर्षांत प्रशासनाचे १० कोटींचे अंदाज चुकले आहेत, असे या तज्ज्ञाने सांगितले.
उत्पन्न घटून खर्च वाढत चालला आहे. नवीन प्रकल्पांसाठी तरतुदी नाहीत. परिवहनचे स्वत:चे हक्काचे उत्पन्न निश्चित नसताना आस्थापना खर्च २७ लाखांवरून यावर्षी ६३ लाख करण्यात आला आहे. कोणा परिवहन संघटनेच्या नेत्यास ‘सांभाळण्यासाठी’ हा खेळ करण्यात आला आहे का, असे प्रश्न या जादुई आकडय़ाच्या निमित्ताने करण्यात येत आहेत. डिझेल, सुटे भाग, टायर यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. पालिका प्रशासनाने उपक्रमाला गेल्या तीन वर्षांत दीड कोटी, पाच कोटी निधी दिला. यावेळी ११ कोटींच्या निधीची अपेक्षा ठेवण्यात आली आहे. परिवहन उपक्रमाला स्वत:चे ठोस महसुली उत्पन्न नसताना अर्थसंकल्पाचे आकडे फुगवून उपक्रम नक्की साध्य करतो काय, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
० अर्थसंकल्पातील त्रुटी
० मनपा वाहनांना २ कोटी ३० लाखांचे डिझेल पुरवल्याची नोंद नाही.
० पोलीस निधी ७५ लाख होता, तो २ कोटी ४० लाख कसा झाला.
०  बस आरक्षणात आठ महिन्यांत नऊ कोटी जमा होतात, मग आगामी तीन महिन्यांत ते ३० कोटी ७२ लाख कसे होणार.
० बस खरेदीचे २ कोटी २५ लाख मुदत ठेवीत आहेत आणि ते उत्पन्नही दाखवितात.
० दैनिक प्रवास भत्ता ६२ लाखांवरून थेट ७२ लाख कसा झाला.
० प्रधान दुरुस्ती खर्च ५० हजारांची तरतूद असताना खर्च मात्र सव्वा लाख केला.
० बस खरेदीसाठी १७ कोटींची तरतूद असताना २१ कोटी ६५ लाख कोठून आले.
० दरवर्षी उत्पन्नात १० कोटींची तफावत.