जिल्ह्य़ातील १३२ गावांमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जळकोट तालुक्यातील सात गावांत शासकीय अधिकारी उद्या (रविवारी) मुक्कामी थांबणार आहेत.
साठ टक्क्य़ांपेक्षा जास्त शौचालये असलेल्या गावांची निवड या उपक्रमात करण्यात आली असून, तालुक्यातील धामणगाव, चिंचोली, केकतसिंदगी आदी गावांत अधिकारी घरोघरी जाऊन भेट देणार आहेत. गावात शंभर टक्के शौचालये झाली तर मिळणाऱ्या शासकीय योजनांची माहितीही घरोघरी जाऊन दिली जाणार आहे. निर्मलग्रामसाठी गावकऱ्यांना प्रोत्साहन देऊन शौचालय बांधण्यास प्रवृत्त करण्याची ही योजना आहे. स्वच्छतेकडून समृद्धीकडे हा मंत्र नागरिकांना पटवून दिला जाणार असल्याचे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी सांगितले.
यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी जिल्ह्य़ातील गावात मुक्काम ठोकून गावकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची मोहीम हाती घेतली होती. नव्याने आलेल्या नामदेव नन्नावरे यांनीही सिंह यांच्या पावलावर पाऊल ठेवून ग्रामीण भागातील लोकांशी थेट संवाद साधण्याची मोहीम हाती घेतली आहे.