झटपट विहिरींचा आधार!
शेतकऱ्यांच्या दिमतीला आले नवे यंत्र
औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांतील २९ हजार ८६३ हेक्टर क्षेत्रावरील मोसंबीच्या बागा पूर्णत: जळाल्या. सुमारे ६० हजार शेतकरी अडचणीत आले. ज्या शेतकऱ्यांच्या बागा काही वाचतील अशी आशा आहे त्यांनी झटपट विहिरी घेण्याचे ठरविले आहे. दुष्काळी भागात झटपट विहिरी खणण्यासाठी नवे यंत्र आले असून, तासाला २ हजार ६०० रुपये असा त्याचा दर आहे. ३५ ते ४० तासांत एक विहीर खणून होत असल्याने याला प्राधान्य दिले जात आहे.
कूपनलिकांपेक्षा विहिरींना पाझर अधिक असतो. जेथे पाणी लागत नाही, तेथील शेतकऱ्यांनी टँकरने फळबागेस पाणी देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा दरही अलिकडेच वाढला असून ४ हजार लिटरच्या टँकरसाठी एक हजार रुपये आकारले जात आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांत मोसंबी हे पारंपरिक पीक आहे. हेक्टरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च व कमी श्रमात उत्पन्न यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात मोसंबी बागा आहेत. लागवडीनंतर पाच वर्षांने उत्पादन मिळते.
या वर्षी बागा जळाल्याने अर्थकारणच रुतून बसले आहे. एखाद्या शेतकऱ्याची बाग जळाली तर त्याचे अर्थकारण १० वर्षांनी मागे असे कृषी अधिकारी सांगतात. नव्याने बाग उभी करणे तसे अवघड काम आहे. बाग लागवडीसाठी प्रतिहेक्टरी मिळणारे अनुदान, कर्ज यासाठी बरेच हेलपाटे शेतकऱ्यांना घालावे लागतात. त्यामुळे नव्याने फळबाग लागवडीच्या भानगडीत शेतकरी पडतील का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बागा वाचू शकतील, त्यांना तातडीची गरज म्हणून हेक्टरी ३० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करावे, असा प्रस्ताव कृषी विभागाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. तथापि, त्याला अजूनही मंजुरी मिळाली नाही.
दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा बसू लागला की, उर्वरित क्षेत्रही वाळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे झाड टिकवून ठेवण्यासाठी आता शेतकरी टँकरने पाणी देऊ लागले आहेत. त्याचा दरही वधारला आहे. दररोज टँकरने पाणी कोण आणून टाकणार, हे कोडे असल्याने काही शेतकऱ्यांनी टँकरच विकत घेतले आहेत. ज्यांनी टँकर विकत घेतले तो शेतकरी श्रीमंत अशी आता व्याख्या बनू लागली आहे. काही जणांनी पाण्यासाठी झटपट विहिरी खणल्या आहेत. यासाठी नवीन मशीन बाजारात आले असून त्याचा तासाला २६०० रुपये असा दर आहे. या यंत्राने औरंगाबाद जिल्ह्य़ात १०० पेक्षा अधिक विहिरी खणल्या असल्याचे संतोष शामसिंग सिंघल यांनी सांगितले.बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथील उत्तम किशन भुशिंग यांची दीड एकर मोसंबीची बाग आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत. परिसरातील पाच ते सात किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी त्यांनी टँकर लावला आहे. त्याचा दर हजार रुपयांपर्यंत वधारला आहे. पूर्वी हे दर ६०० रुपये होते. अशा शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून पाठविण्यात आलेला प्रस्ताव धूळ खात आहे. पिकांच्या नुकसानीबाबतचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला नव्हता. गुरुवारी पुणे येथे दुष्काळी तालुक्यातील पिकांचे किती नुकसान झाले, या बाबतचा आढावा कृषिमंत्री विखे-पाटील यांनी घेतल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा