शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे म्हणून सोलापुरात शिवसैनिकांनी श्री रूपाभवानी मंदिरात महाआरती करून साकडे घातले. अन्य मंदिरांमध्येही पूजाअर्चा व इतर धार्मिक विधी केले जात आहेत. तुळजापूरच्या श्रीतुळजाभवानीमातेचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या सोलापूरच्या श्री रूपाभवानी मातेच्या मंदिरात शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण व विद्यार्थी सेनेचे विभागीय संघटक महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महाआरती केली. या वेळी सर्वानी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्यासाठी करूणा भाकली. शिवसेनाप्रमुख ठाकरे हे तमाम शिवसैनिकांचे तारणहार आहेत. त्यांचे छत्र कायम शिवसैनिकांच्या मस्तकावर राहावे म्हणून आपण रूपाभवानीमातेला साकडे घातले. आपण भाकलेली करूणा ऐकून रूपाभवानीमाता निश्चितपणे धावून येणार, असा विश्वास प्रताप चव्हाण यांनी व्यक्त केला.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तमाम शिवसैनिकांचे आराध्यदैवत असून खऱ्या अर्थाने हिंदूहृदयसम्राट आहेत. त्यांना दीर्घायुष्य मिळणारच असा दावा करीत एका शिवसैनिकाने होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथून श्री रूपाभवानी मंदिरापर्यंत लोटांगण घातले.     

Story img Loader