राज्याच्या प्रमुख पाणीसाठय़ांतील पाणी आटल्यामुळे विदेशातून येणाऱ्या पक्ष्यांना आता पाण्याच्या शोधार्थ विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. लातूर जिल्हय़ात सुमारे ३७ विदेशी पाणपक्ष्यांच्या प्रजाती आढल्याचे बीएनएचएसकडून केलेल्या पाहणीत दिसून आले.
अहमदपूर, चाकूर व रेणापूर तालुक्यांतील काही तलावांमधून सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे पक्षी अभ्यासक सुजित नरवडे, डॉ. बी. आर. बोडके, शहाजी पवार, विठोबा हेगडे आदींच्या पथकाने पक्ष्यांच्या प्रजातीची यंदा प्रथमच विविध पाणवठय़ांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. हजारो वर्षांपासून विदेशातील पक्षी पाणी व अन्नाच्या शोधार्थ भारतात येतात. काही पक्ष्यांचे थवे मोठय़ा संख्येने पाण्याच्या शोधार्थ फिरत असतात. पुरेशा पाणीसाठय़ाचा अंदाज आला तरच ते खाली उतरतात अन्यथा पुढच्या दिशेला मार्गस्थ होतात. या वर्षी पक्षी अभ्यासक जिल्हाभर फिरून माहिती घेत असून विदेशातील पक्षी लातूपर्यंत येऊन पोहोचल्याचे त्यांना आढळून आले. अहमदपूर तालुक्यातील कोपरा तलावात ओरिएंटल डार्टर, खग, लालक्षरी, तलवार बदक, गार्गेनी जातीची सायबेरियन पट्टय़ातून येणारी बदके हजारोंच्या संख्येने आले आहेत. जलवनस्पती, जलचर प्राण्यांच्या उपलब्धतेवरच हे थवे डेरा टाकतात. पक्ष्यांची शिकार करणाऱ्या दलदल बहेरी ससाण्याच्या दोन जोडय़ाही या भागात आढळल्याची माहिती नरवडे यांनी दिली.
नेमके भक्ष्य टिपणारे स्पून बिल, तसेच ग्रे हेरॉन, इग्रेड जातीचे बगळे मोठय़ा प्रमाणावर आढळले आहेत. हिरवळीतील कीटक टिपणारे व पाण्यात सूर मारून कार्यभाग उरकणारा जांभळय़ा रंगाचा पानकोंबडय़ा, कृष्णधवल खंडय़ा, रंगीत धिवर या तलावावर आढळले आहेत. गोगलगाय, बेडूक, छोटे मासे, जलवनस्पती हे पाणपक्ष्यांचे खाद्य असते. दलदलीच्या ठिकाणी हे मोठय़ा प्रमाणात असतात. अशा ठिकाणी मुक्काम करणे या पाणपक्ष्यांना आवडते. ज्या पाणवठय़ावर माणसांचा वावर कमी आहे, अशा ठिकाणीच या पक्ष्यांची चांगली संख्या असते. यंदा दुष्काळामुळे विदेशातील पक्ष्यांना अन्नासाठी अधिक भटकंती करावी लागत आहे. त्याचा नेमका अभ्यास करण्यासाठी मराठवाडा व विदर्भातील या वर्षी बीएनएचएसच्या पथकाने पाहणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा