इतिहासाविषयी किती प्रेम असावे, याचे दाखले बीड जिल्हय़ात देताना एक नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजे डॉ. सतीश साळुंके. जिल्हय़ाच्या कानाकोपऱ्यात हा माणूस फिरला, ते केवळ इतिहास जाणून घेण्यासाठी नि अभ्यासण्यासाठी. कानाकोपऱ्यात विखुरलेले १२४ शिलालेख त्यांनी शोधले. या शिलालेखांच्या माध्यमातून जिल्हय़ाचा इतिहास उलगडून दाखवला.
केवळ पुस्तके न लिहिता शाळांमधील लहान मुलांना हा इतिहास आवर्जून सांगण्याचे काम डॉ. साळुंके करतात. बीड जिल्हय़ाचा ‘प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. बीड शहरातील संस्कार विद्यालयात डॉ. साळुंके शिक्षक म्हणून काम करतात. शिकवताना शाळेत मुलांना विचारलेले प्रश्न सतत मनात घोळत राहायचे. त्या प्रश्नांची उत्तरे शोधताना ते इतिहासात रमले. एवढे, की डॉ. साळुंके यांनी आतापर्यंत १२४ शिलालेख तर शोधलेच. त्यातील ४६ फारसी भाषेतील शिलालेखांचाही अभ्यास पूर्ण केला.
डॉ. साळुंके यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची. परिस्थितीनेच जगण्याची कला अवगत करत सतीश मोठे झाले. नोकरी मिळवली. पण मुळात वृत्तीच चिकित्सकाची. केवळ चिकित्साच नाही तर त्यांच्यात एक नाटककारही दडला आहे. नाटकांची २५ पुस्तके आणि एकांकिकेचे विपुल लेखन करणारा अशीही त्यांची ओळख आहे. त्यांच्या तालमीत अनेकजण घडले. शहरात जाऊन काहीजणांनी नाव कमावले. साळुंके मात्र इतिहासात रमले. जिल्हय़ाच्या विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांची छायाचित्रे काढून त्यांनी ती शाळेत मुलांना पाहण्यासाठी ठेवली आहेत.
इंग्रजांविरुद्ध उभारलेला पहिला लढा परळी तालुक्यातील डाबी गावात लढला गेला. त्यात शहीद झालेल्या धर्माजी प्रतापराव मुंडे यांची नंतर जिल्हय़ाला क्रांतिकारक म्हणून ओळख पटली. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी साळुंके यांच्या कामाचे अनेकदा कौतुक केले. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे मुंडे घराण्याची कॉलर अधिक ताठ झाली, असेही ते आवर्जून सांगतात. डॉ. साळुंके म्हणतात, भाषा जशी व्याकरणावर उभी असते, तसे इतिहास साधनांवर उभा असतो. प्राचीन काळातील नाणी, शिलालेख, हस्तलिखित, उत्खननातील भांडे ही नीटपणे पाहिली, की संशोधन करता येते. अशा साधनांचा जिल्हय़ाचा इतिहास शोधताना मदत झाली.
सरकारी यंत्रणेची मदत न घेता स्वखर्चातून केलेले त्यांचे कार्य नेहमीच चर्चेत असतात. विविध अभ्यासाच्या निमित्ताने ते विदेशातही जात असतात. त्याचबरोबर त्यांचे नाटकांवरील प्रेमही सर्वाना भावते. ‘शामला हवा आहे कृष्ण’, ‘एका देशाचा शिल्लक इतिहास’, ‘समन्स’, ‘अस्वस्थ तरीही’, ‘अनुची आई’, ‘रमाची गोष्ट’ या त्यांच्या पुस्तकांनाही पुरस्कार मिळाले. जिल्हय़ात सांस्कृतिक चळवळ वाढविण्यासाठी धडपडणारा कलावंत, अशी डॉ. साळुंके यांची ओळख आहे.
सांस्कृतिक चळवळीचा अग्रदूत
इतिहासाविषयी किती प्रेम असावे, याचे दाखले बीड जिल्हय़ात देताना एक नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजे डॉ. सतीश साळुंके. जिल्हय़ाच्या कानाकोपऱ्यात हा माणूस फिरला, ते केवळ इतिहास जाणून घेण्यासाठी नि अभ्यासण्यासाठी. कानाकोपऱ्यात विखुरलेले १२४ शिलालेख त्यांनी शोधले.
First published on: 02-02-2013 at 03:56 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forerunner of cultural campaign