नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता विस्तारीकरणाचे काम सुरू असतानाच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने ‘दूरदृष्टी व नियोजन’ चा फलकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या अनोख्या प्रकाराचा उलगडा अखेर दस्तुरखुद्द खा. समीर भुजबळ यांनीच केला. हे फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावले असून आम्ही नाही तर कोण उभारणार, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीच्या स्पष्टीकरणामुळे जिल्ह्यासह राज्यातील कोणत्याही भागात महामार्गाचे विस्तारीकरण वा तत्सम स्वरुपाचे काम झाल्यास त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग हा राष्ट्रवादीच्या अखत्यारीत असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असे काही फलक उभारल्यास त्यास पक्ष नेतृत्वाची ना नसणार हे स्पष्ट झाले आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघातील विकासकामांची माहिती देण्यासाठी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी खा. भुजबळ यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गाच्या विस्तारीकरणादरम्यान ठिकठिकाणी उभारलेल्या फलकांवर प्रश्न उपस्थित झाल्यावर उपरोक्त बाब स्पष्ट केली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, सध्या नाशिक-त्र्यंबकेश्वर या ३० किलोमीटर रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. राज्यात कुठेही या स्वरुपाचे काम सुरू झाल्यास हा विभाग ठेकेदाराकरवी त्या कामाचे स्वरुप, त्यावर झालेला खर्च, काम कधी सुरू झाले व कधी पूर्ण होणार याची माहिती फलकाद्वारे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देत असतो. परंतु, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अशा माहितीच्या फलकांऐवजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या दूरदृष्टी व नियोजनाचा उल्लेख करण्यात आल्याने अनेक जण चकीत झाले.
या मार्गावर प्रारंभी ‘मा. ना. छगन भुजबळ मंत्री, सां. बां. व पर्यटन यांचे दूरदृष्टी व नियोजनातून व मा. समीर भुजबळ, खासदार यांच्या प्रयत्नातून’ असे फलक ठिकठिकाणी उभारले गेले. नंतर पालकमंत्री व खासदार यांचे छायाचित्र असलेले ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर प्रथम पालखी मार्गाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद’ असे फलक उभारले गेले. विशेष म्हणजे, हे फलक कोणी उभारले हे कुठेही  स्पष्ट करण्यात आलेले नव्हते. शासनाच्या निधीतून हे सर्व काम होत असताना आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून रस्त्याची कामे करणे ही त्या मंत्र्यांची जबाबदारी असताना असे फलक लावणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न वाहनधारकांनी उपस्थित केला होता. निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांनाही तसाच प्रश्न पडला. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने या फलकांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले होते. या पाश्र्वभूमीवर खा. भुजबळ यांच्याकडे उपरोक्त फलकांविषयी विचारणा केली असता त्यांनी हे सर्व फलक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उभारल्याचे नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा