या शहरात बिबटय़ाचा धुमाकूळ सुरूच असून काल गुरुवारी रात्री येथील बायपासवरील बाबानगरात चरणदास लकडे (६०) या इसमाचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, वनखात्याने हा मृत्यू बिबटय़ाच्या हल्ल्यात झालाच नाही, असा दावा केला, तर पोलीस व शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यातच झाल्याचे सांगितल्याने वन व पोलीस खात्यात चांगलीच जुंपली असून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
या जिल्ह्य़ात वाघ व बिबटय़ाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून आतापर्यंत बारा लोकांचे बळी घेतले आहेत. काल गुरुवारी मध्यरात्री चंद्रपूर-बल्लारपूर बायपासला लागून बाबानगरात बिबटय़ाने चरणदास लकडे याचा बळी घेतला. काल रात्रीच ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील लोकांनी वनखात्याला ही माहिती दिली. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी चंद्रपूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे यांना ही माहिती कळविली, तर शहर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बघितले असता मृत चरणदास लकडे यांच्या उजवा हात वन्यप्राण्याने पूर्णत: खाल्लेला होता आणि इतर अवयवही फस्त केले होते. प्रथमदर्शनी बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू वाटत असतांना वनखात्याने हात झटकले असून पोलीस दलाकडे बोट दाखविले आहे. असला मृत्यू बिबटय़ाच्या हल्ल्यातील राहूच शकत नाही, असा दावा वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे यांनी केला, तर शहर पोलिसांनी केवळ मर्ग दाखल करून वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद घेतली आहे.
दरम्यान, वनखात्याने हात झटकले असले तरी मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मशीला कुमारी यांच्या म्हणण्यानुसार लकडे यांचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यातीलच आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती लोकसत्ताला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र हे कारण स्पष्टपणे नाकारले आहे. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार लकडे यांचा मृत्यू घरातच झाला. त्यांचा उजवा हात वन्यप्राण्यांनी जरी खाल्ला असला तरी तो बिबटय़ाच आहे, असे कशावरून, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. जंगली कुत्रे, गावठी कुत्र्यांच्या हल्ल्यात सुध्दा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण आपण स्वत: सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण वन्यप्राण्यांचा हल्ला असल्याचे सांगितले, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता वन्यप्राणी कुठलाही असू शकतो, असेही ते म्हणाले. मागील दोन प्रकरणातही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण वन्यप्राण्यांचा हल्लाच सांगितले होते. आता याही प्रकरणात मृत्यूचे कारण वन्यप्राणी सांगितले असले तरी प्रत्यक्ष बिबटय़ा किंवा वाघाने पावलांचे ठसे दिसल्याशिवाय आपण ते मान्य करायला तयार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान पोलिसांनी सुध्दा हा मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाल्याची नोंद घेऊन मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणून ठेवला. लकडे यांच्या मृत्यूच्या दावे प्रतिदाव्यावरून पोलीस दल व वनखात्यात चांगलीच जुंपली असून ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लकडे यांचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झाल्याचे सांगितल्यानंतरही वनखाते ते मानायला तयार नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लकडे यांच्या कुटुंबीयाला वनखात्याने शासकीय मदतही नाकारली आहे. दरम्यान, ज्या परिसरात लकडे यांचा मृत्यू झाला तेथे बिबटय़ाचा वावर असल्याचे निदर्शलास आले आहे. काल बुधवारीच या परिसरातील लोकांना बिबटय़ाने दर्शन दिले होते. तेव्हाच परिसरातील काही लोकांनी बिबटय़ाच्या बंदोबस्तासाठी माजी खासदार नरेश पुगलिया व स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांची भेट घेतली होती. आता लोकांनी बिबटय़ाला बघितल्यानंतरही वनखात्याने बिबट नाहीच, अशी भूमिका घेतल्याने सर्वानाच आश्चर्य वाटत आहे. दरम्यान, या घटनेनंतर लोकांनी बिबटय़ाचा बंदोबस्त तातडीने करण्याची मागणी लावून धरली आहे.

हल्ल्यातील बळी
२४ मार्च- अनुसया शेंडे, पालेबारसा ता. सावली.
६ एप्रिल- ध्रुपदा मडावी, सादागड ता. सावली.
१० एप्रिल- तुकाराम धारणे व मालन मुनघाटे, आगरझरी ता. चंद्रपूर.
११ एप्रिल- ललिता पेंदाम, पाथरी ता. सावली.
१२ एप्रिल- निलिमा कोटरंगे, चोरगाव ता. भद्रावती.
१७ एप्रिल- किर्ती काटकर, पायली ता. चंद्रपूर.
१८ एप्रिल- गोपिका काळसर्पे, किटाळी ता. चंद्रपूर.
७ मे- अज्ञात मनोरुग्ण महिला
१० मे- राजू अलकंटीवार, चंद्रपूर
१० मे- अनोळखी महिला, ब्रम्हपुरी
१६ मे- चरणदास लकडे, बाबानगर, चंद्रपूर

Story img Loader