जिल्ह्य़ातील राखीव प्रादेशिक वने व अभयारण्ये विरळ होत असल्याने, तसेच या वनांमधील जैवविविधता मोठय़ा प्रमाणावर नष्ट होत असल्याने मास भक्षी व तृण भक्षी वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जैवविविधतेचे संपूर्ण संरक्षण, जंगलाची घनता कायम ठेवणे, खाद्यान्न व पिण्याच्या पाण्याची पर्याप्त व्यवस्था करणे, हे यावरील प्रभावी उपाय असून जंगल संरक्षण व संवर्धनावर कोटय़वधी रुपये खर्च करणारा वन व वन्यजीव विभाग यात संपूर्णपणे अपयशी ठरला आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ात सातपुडा, अजिंठा पर्वतरांगातील राखीव जंगले, मेहकरच्या सप्तऋषी खोऱ्यातील राखीव जंगले, अंबाबरवा, ज्ञानगंगा ही प्राणी अभयारण्ये, लोणार पक्षी अभयारण्य ही नैसर्गिक संपत्ती आहे. जिल्ह्य़ात एकूण ११६६ चौ. कि. राखीव वनक्षेत्र आहे. या संपूर्ण वनक्षेत्रात बिबटय़ा, अस्वल, लांडगे, तडस, रानडुक्कर, काळविट, हरीण, ससे, यासारखे मासभक्षी व तृण भक्षी वन्यप्राणी आहेत. जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर झुडपी जंगले आहेत. या जंगलांची घनता वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले नाहीत. याउलट, प्रचंड वृक्षतोड व जंगल संपत्तीचा ऱ्हास यामुळे या जंगलाची घनता मोठय़ा प्रमाणावर कमी होत आहे. सध्या ही घनता अर्धा टक्काही नाही. त्यामुळे जैवविविधताही धोक्यात आली आहे. जैवविविधता व वनांची घनता धोक्यात आल्याने वन्यप्राण्यांना सुरक्षित आश्रयस्थाने शिल्लक राहिलेली नाहीत. त्यांच्या अधिवासाचा मुलभूत प्रश्न निर्माण झाला आहे.
दरवर्षीच जिल्ह्य़ातील उन्हाळा अतिशय कडक असतो. त्यामुळे वन्यप्राणी रात्री भटकंती करतांना दिसतात. अन्न व पाण्याची टंचाई असल्याने हे प्राणी मानवी वस्त्यांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे वन्यप्राणी व मानवांचा संघर्ष सुरू होतो. गेल्या चार वर्षांत अशा प्रकारात एक डझनहून अधिक व्यक्ती बळी गेले असून शंभरावर इसम जायबंदी झाले आहेत. अशा संघर्षांत आतापर्यंत वन्यप्राण्यांचे मोठय़ा प्रमाणावर बळी गेले आहेत. त्यामुळे जंगलाची घनता वाढविणे, प्राण्यांना सुरक्षित अधिवासाची ठिकाणे उपलब्ध करून देणे, त्यांच्या अन्नपाण्याची सुविधा करणे या प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. प्रादेशिक वनविभाग व वन्यजीव विभाग यांच्याकडून वन संरक्षण व संवर्धनासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च होतो. त्याचा कुठलाही फायदा होतांना दिसत नाही. वनसंरक्षण व वनसंवर्धन होत नसल्यानेच वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा