दोन विभागांमध्ये खर्चावरून जुंपली
पिण्याच्या पाण्यासाठी शहराकडे आलेल्या माकडांनी ठिकठिकाणी हल्ले चढवून नागरिकांना जखमी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला असला, तरी या माकडांना पकडण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने वनविभागही हतबल असल्याचे चित्र आहे!
यंदा दुष्काळाच्या झळा सामान्य नागरिकांसह वन्यप्राण्यांनाही जाणवत आहेत. जंगलातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटल्याने शहराच्या अनेक भागात माकडांची ‘उड्डाणे’ सुरू आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महानगराकडे आलेल्या या माकडांनी काही भागात गोंधळ घातला. शहराच्या भावसार चौकानंतर चौफाळा परिसरात माकडांच्या गोंधळामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले. माकडांना पकडायचे कोणी? त्यासाठी पैसा कोणी खर्च करायचा यावरून वनविभाग व महापालिका प्रशासनात मतभेद सुरू आहेत.
वन विभागाने माकडांना पकडण्याची तयारी दर्शवली असली, तरी त्यासाठी लागणारा खर्च करण्यासाठी आवश्यक निधीची त्यांच्या विभागाकडे तरतूद नाही. कोणत्याही प्राण्याला पकडणे किंवा मृत वन्य प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शासन नियमानुसार वन विभागाकडे कोणताही निधी येत नाही. भावसार चौकातील माकडे पिटाळून लावण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी स्वत:च्या खिशाला कात्री लावली. आता चौफाळा परिसरातील माकडे पकडण्यासाठी वन अधिकाऱ्यांची तयारी असली तरी त्यासाठी निधी महापालिकेने द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक शंकरवार यांनी सांगितले की, वन्यप्राणी पकडण्याची आमची तयारी आहे. आमचे प्रयत्नही सुरू आहेत. पण त्यासाठी लागणारा खर्च महापालिकेने द्यावा. पालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी खर्च देण्याची तयारी दर्शविली आहे. महापालिका हद्दीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जिवाची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे. वन्य प्राण्याला वन अधिकाऱ्यांनी पकडावे. त्यासाठी लागणारा खर्च देण्याची आमची तयारी आहे. चौफाळा परिसरात माकडांच्या गोंधळाचा फटका आतापर्यंत चारजणांना बसला आहे. ही माकडे जाणाऱ्या-येणाऱ्या माणसांना जखमी करत आहेत. ही बाब नगरसेवक सतीश राखेवार यांनी वन विभाग, तसेच महापालिका प्रशासनाच्या कानी घातली व तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. महापालिकेने खर्च देण्याची तयारी दाखवल्यानंतर आता वनविभाग किती तत्परतेने या वन्यप्राण्यांना पकडेल, हे आगामी काळात स्पष्ट होईल.