पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जीव गमवाव्या लागणाऱ्या येवला तालुक्यातील हरिण व काळवीटांची तहान वनक्षेत्रातच भागविण्याच्या व्यवस्थेकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. परिसरातील १३ ठिकाणी वनखात्याने दहा हजार लिटरचे पाणस्थळ साकारले खरे, पण त्यात नियमितपणे पाणी टाकण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने ही बाब वन्यप्राण्यांच्या जीवावर बेतली आहे. या पाश्र्वभूमीवर, क्रेडाईसह अन्य काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत आता वन्यप्राण्यांची तहान भागविण्याची धडपड चालविली आहे.
तहान भागविण्यासाठी नागरी वस्तीकडे धाव घेणारे हरिण व काळवीटांना कुत्र्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागतो. गेल्या काही दिवसात अशा काही घटनांमध्ये सहा ते सात हरिणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यावर वन विभागाने कुत्र्यांच्या मालकावर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे. वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने असा पवित्रा स्वीकारला असला तरी ज्या पाण्यासाठी प्राण्यांना नागरी वस्ती गाठावी लागते, त्या समस्येवर सोयीस्करपणे मौन बाळगले आहे. वनातील साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या अनेक उपाययोजना आहेत. त्या अंतर्गत चारा खाद्य उपलब्ध करून देणे आणि टंचाई काळात पाण्याची व्यवस्था करणे महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने वन खात्याने येवला तालुक्यातील तळवाडे, भुलेगाव, पिंपळकुटे बुद्रुक, कोळम, ठाणगाव, ममदापूर, राजापूर, सोमठाण जोश, कुसुमाडी, रहाडी, देवदरी, रेंडाळे अशा एकूण १३ ठिकाणी दहा हजार लिटरची पाणस्थळ तयार केली आहेत. परंतु, दुष्काळाच्या काळात त्यात पाण्याची कोणतीही व्यवस्था होत नाही. वनक्षेत्रात पाणी नसल्याने प्राण्यांना नाईलाजास्तव पाण्याच्या शोधार्थ नागरी वस्तीकडे जावे लागते.
ही बाब लक्षात आल्यावर भुजबळ फाऊंडेशन, काबरा ट्रस्ट, खटपट मंच आदी सामाजिक संस्थांनी काहीवेळा पाण्याची मदत केली. त्यात सातत्य न राहिल्याने हरिणांचा नागरी वस्तीकडे प्रवास सुरू राहिला. यामुळे क्रेडाई संस्थेने वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी आता अनोखा उपाय शोधला आहे. या संस्थेचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाणवठय़ालगतच्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला निश्चित करून या ठिकाणी पाणी टाकण्याचे आवाहन केले. त्यास चांगला प्रतिसाद लाभल्याने सद्यस्थितीत पाणवठय़ांमधून वन्यप्राण्यांची तहान भागत आहे.
विहिरीत पडून हरिणांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने वन विभागाने या परिसरातील कथडे नसलेल्या विहिरींना ते बांधले जावेत, याकरिता पाठपुरावा सुरू केला आहे. येवला तालुक्यातील ७,३७२ वनक्षेत्रापैकी १२० हेक्टरवर निंब, करंजी, चिंच, काशिद, शिवन, बाभुळ आदींची लागवड करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या कुरण विकास योजनेंतर्गत हरणांसाठी दोन हेक्टर क्षेत्रात सावरगाव येथे गवत तयार करण्याची योजनाही हाती घेण्यात आली आहे.
    (उत्तरार्ध)

Story img Loader