विदर्भातील कोणत्याही कानाकोपऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवला किंवा इतर काही कारणांमध्ये वाघ किंवा बिबट जखमी झाले तर त्यांची थेट रवानगी नागपुरातील महाराजबाग प्राणिसंग्रहालयात करणे हे अगदी ठरलेले आहे. वनखात्याने जखमी वन्यप्राण्यांचे साठवण केंद्र बनवलेले हेच प्राणिसंग्रहालय आता प्रजनन केंद्र म्हणून उदयास येऊ शकत असताना, वनविभागाकडूनच त्याला चाप लावला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील मोठय़ा पिंजऱ्यात असलेल्या दोन वाघिणी जंगलात सोडण्याच्या आणि एका वाघाला पुण्यातील कात्रज प्राणिसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्रात पाठवण्याच्या निर्णयावर अलीकडेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत यांनी शिक्कामोर्तब केले. मात्र, तत्पूर्वी प्राणिसंग्रहालय प्रशासन आणि वनखात्यात या वाघाच्या देवाणघेवाणीवरून बरीच पत्रोपत्री झाली. पेंचमधील नर वाघ पुण्यात पाठवण्याच्या हालचाली सुरू असतानाच महाराजबाग प्रशासनाने या वाघाची मागणी केली.
महाराजबाग प्राणिसंग्रहालयात सद्यस्थितीत सध्या तीन वाघीण व एक अपंग वाघ आहे. अपंग वाघ प्राणिसंग्रहालयात ठेवता येत नसल्यामुळे त्याला बंगलोरजवळील बनारकट्टा येथे अनाथालयात पाठवण्यात येणार आहे. प्राण्यांच्या जैविक गरजा आणि प्राणिसंग्रहालय मान्यता नियम २००९नुसार प्राणिसंग्रहालयात नर व मादी वन्यप्राणी योग्य संख्येत ठेवणे आवश्यक आहे.
अपंग वाघ अनाथालयात पाठविण्यात येणार असल्याने तीन वाघिणींकरिता पेंचमधील या वाघाची मागणी करण्यात आली. १८ जानेवारी २०१४ ला पेंच प्रशासनाने त्याकरिता संमती दर्शवली. दरम्यानच्या काळात या वाघाला पुण्यात पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे महाराजबाग प्रशासनाने त्यावर आक्षेप घेत आधीच्या निर्णयाचे काय, अशी विचारणा पेंच प्रशासनाला केली. त्यावर सर्जन भगत यांनी या वाघाच्या मोबदल्यात महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील एका वाघिणीचा स्वीकार करायला लावल्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात आल्याचे महाराजबाग प्रशासनाला कळवले. त्यावर पुन्हा महाराजबाग प्रशासनाने सर्जन भगत यांना वनविभागाच्या नियमित अस्वस्थ वन्यप्राण्यांच्या संगोपनाचा दाखला देत, पेंचचा वाघ महाराजबाग प्राणिसंग्रहालयालाच देण्यात यावा, अशी विनंती केली आहे. सृष्टी पर्यावरण संस्थेनेही वनविभागाच्या निर्णयावर आक्षेप घेत पेंचच्या वाघाला नागपुरातच रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आंतरप्रजननामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या रोडावत असताना, महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वाघांचा आजपर्यंतचा इतिहास बघता वाघांचे प्रजनन केंद्र म्हणून ते उदयास येऊ शकते. मात्र, वनखात्याकडूनच अप्रत्यक्षपणे त्याला चाप लावला जात असल्याची भावना वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला वाघांच्या प्रजनन केंद्राचा दर्जा मिळाल्यास महाराष्ट्रातील ते पहिले वाघांचे प्रजनन केंद्र ठरेल. त्यासाठी आमच्या हालचाली सुरू आहेत. असे झाल्यास या ठिकाणाहून इतर प्राणिसंग्रहालयात वाघ पाठविता येतील. त्यामुळे पेंचच्या वाघाला पुण्यात न पाठवता महाराजबाग प्राणिसंग्रहालयाकडे त्याची रवानगी करण्याची मागणी मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी केली.

Story img Loader