मंत्रालयात मुख्यमंत्री, जिल्ह्यात पालकमंत्री तसेच विविध खात्याच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. मात्र, महाराष्ट्रदिनी वनखात्याच्या मुख्यालयात गेल्या अनेक वर्षांंपासून ध्वजारोहणाची ही परंपरा भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांनी मोडीत काढून कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाची परंपरा सुरू केली आहे. त्यामुळे राज्याच्या स्थापनादिनाला अधिकाऱ्यांकडूनच दाखवली जाणारी पाठ वनखात्याच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
शासकीय कार्यालयात त्या कार्यालयाचा मुख्य अधिकारी ध्वहारोहणाला उपस्थित राहू शकत नसेल तर कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करता येते. तरीही आजतागायत असा प्रकार कोणत्याही कार्यालयात झाल्याचे ऐकिवात नाही. स्वातंत्र्यदिन असो, प्रजासत्ताक दिन असो वा महाराष्ट्र दिन यादिवशी होणाऱ्या झेंडावंदनाला मुख्य अधिकाऱ्यांसह सर्वाचीच उपस्थिती असणे गरजेचे असते. मात्र, महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ध्वहारोहणाला वनखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून डावलण्याचा प्रकार सुरु आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महाराष्ट्रदिनी चक्क ध्वहारोहणालाच दांडी मारण्याचा प्रकार सुरु होता. पाच-सहा वर्षांपूर्वीपर्यंत विद्यापीठात ध्वजारोहणच केले जात नव्हते. प्रसारमाध्यमांनी ही बाब उघडकीस आणल्यानंतर आता विद्यापीठात महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण केले जाते. राज्याच्या वनखात्यात अध्र्याहून अधिक भारतीय वनसेवेतील अधिकारी हे महाराष्ट्राबाहेरचे आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमागे हे एक कारण तर नसावे ना, अशीही शंका आता उपस्थित केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रदिनी वनखात्याच्या मुख्यालयात सहाय्यक वनसंरक्षक दर्जाचे अधिकारीच ध्वजारोहण करीत आले आहेत. त्यांच्या हस्ते होणारे ध्वजारोहण एकवेळ मान्य, कारण ध्वहारोहण टाळता येत नाही. मात्र, तरीही एक-दोन नव्हे तर सरसकट सर्वच भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आता चर्चेचा विषय ठरली आहे. शासकीय कार्यक्रमाविषयी त्यांची उदासिनता का, असा प्रश्न याठिकाणी उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रदिनी सरकार त्यांना सुटीची खरात वाटप असताना त्या मोबदल्यात त्यांनी ध्वजारोहणालाही उपस्थित राहू नये, यावरून आता शंकाकुशंका सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे प्रादेशिक वनविभागात मात्र विभागातील सर्वच अधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या स्थापनादिनाला वनखात्यातील अधिकाऱ्यांची पाठ
मंत्रालयात मुख्यमंत्री, जिल्ह्यात पालकमंत्री तसेच विविध खात्याच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे.
First published on: 02-05-2015 at 01:57 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest department officials ignore maharashtra day