वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी असलेल्या वनखात्याकडूनच जबाबदारी ढकलण्यासाठी चक्क वाघिणीच्या कृत्रिम स्थलांतरणाचा डाव रचला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील पोहराच्या जंगलात स्थलांतर करून आलेल्या बोर अभयारण्यातील वाघिणीला तिच्या निवासस्थानातून गुपचूपपणे बाहेर काढण्याची तयारी सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिले.
पोहरा-मालखेडच्या राखीव जंगलातील वन्यजीवांचे वास्तव्य वीस वषार्ंपूर्वीच सिद्ध झाले होते आणि त्यावेळीसुद्धा या जंगलात वाघाचे अस्तित्त्व सिद्ध झाले होते. त्यामुळे १९९२ पासूनच पोहरा-मालखेड अभयारण्याची मागणी होत आहे. अलीकडेच झालेल्या वाघिणीच्या दर्शनाने या मागणीला आणखी बळ मिळाले. तब्बल १०० किलोमीटरचे हवाई अंतर पार करून ही वाघीण या जंगलात स्थिरावली. १८ मार्चला तिचे पहिले दर्शन या जंगलात झाले, पण स्थानिक वनखात्याने ही बाब लपवून ठेवली. प्रसारमाध्यमांमध्ये या घटनेची वाच्यता झाल्यानंतर व्याघ्रदर्शनाला त्यांनी दुजोरा दिला. त्यामुळे पुन्हा एकदा वन्यजीवप्रेमींनी अभयारण्याची मागणी उचलून धरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे. अभयारण्य झाल्यास जबाबदारीही वाढेल, म्हणून आता या वाघिणीला गुपचूपपणे जंगलातून बाहेर हलवण्याची तयारी स्थानिक प्रशासनाने सुरू केली आहे. पोहरा राखीव जंगल वाघाचे मूळ निवास्थान आहे. याठिकाणी बिबटय़ांचाही वावर आहे. पोहरा, वडाळी व तिरोडीचे जंगल पूर्वी एकच होते. या जंगलावर गावकऱ्यांचे आणि काठीयावाडय़ांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत गेले. प्रत्येक दिवशी या जंगलात ३०-४० महिला आणि तेवढेच पुरुष सरपणासाठी जातात. तर सुमारे पाच ते सहा हजार गाई चरतात. तरीही आजपर्यंत या जंगलक्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्षांची घटना घडली नाही.
बोर अभयारण्य प्रशासनाने सुरुवातीपासूनच त्यांच्या प्रत्येक वाघाची प्रतिमा कॅमेरा ट्रॅप केली. त्यामुळे पोहराच्या जंगलात वाघिणीचे दर्शन झाल्यानंतर कॅमेरा ट्रॅपमधील त्यांच्या प्रतिमा या वाघिणीशी जुळवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातील एक वाघीण ही बोर अभयारण्यातीलच असल्याचे सिद्ध झाले. नैसर्गिक स्थलांतर झालेल्या या वाघिणीचे आता कृत्रिम स्थलांतर करण्याचा प्रयत्न पोहऱ्याच्या वनखात्याकडून सुरूझाला आहे. काही वन्यजीवप्रेमींनी थंडावलेली अभयारण्याची मागणी पुन्हा उचलण्यास सुरुवात केल्याने वनखात्याने चक्क कृत्रिम स्थलांतरणाचा डाव रचला. मात्र, हे कृत्रिम स्थलांतरण वाघिणीच्या जीवावर बेतणार, अशी प्रतिक्रिया या वन्यजीवप्रेमींनी व्यक्त
केली आहे.
चार दशकांपूर्वी पोहराच्या जंगलात वाघाने दर्शन दिले आहे. गेल्या कित्येक वषार्ंपासून वाघ आणि बिबटे या जंगलात एकत्र आहेत. या जंगलात आजपर्यंत कधी मानव-वन्यजीव संघर्ष अनुभवला नाही. पोहरा राखीव जंगलक्षेत्र हे बोर अभयारण्यातून आलेल्या वाघिणीचे मूळ निवास्थान असावे. आता वाघीण तिच्या मूळ घरात परत आली तर तिला हलवण्याचा घाट का, असा प्रश्न वन्यजीवप्रेमी व लेखक प्र.स. हिरुरकर यांनी केला.